जिल्ह्यात 15 ‘आरोग्यवर्धिनी’ केंद्रांना मंजुरी

रत्नागिरी:- मोठ्या शहरांमध्ये ‘आपला दवाखाना’ सारख्या योजनांमधून सर्वसामान्य नागरिकांसाठी सेवा देण्याचा शासनाच्या आरोग्य विभागाचा प्रयत्न सुरु आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यात नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून 15 आरोग्यवर्धिनी केंद्रांना मंजूर मिळाली आहे.

ग्रामीण भागामध्ये तळागाळातील रुग्णांच्या उपचारासाठी उपकेंद्रांचा आधार असतो. त्याच धर्तीवर शहरांमध्येही ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’ सुरु करण्यात येत आहेत. त्या आरोग्यवर्धिनी केंद्रांना 1 वैद्यकीय अधिकारी, नर्स, परिचर आणि शिपाई अशी पदे मंजूर करण्यात आली आहेत. रत्नागिरीत झाडगाव, कोकणनगर येथे जिल्हा परिषदेची उपकेंद्र कार्यरत आहेत. त्यामुळे शहरात उद्यमनगर, लक्ष्मीचौक परिसरात दोन वर्धिनी केंद्र सुरु केली जाणार आहेत.

ही केंद्र सुरु करण्यासाठी निश्चित केलेल्या परिसरात भाडेतत्त्वावर जागा घ्यावयाच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी स्थानिक पालिका किंवा नगर पंचायतीचे सहकार्य घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. सध्या मंजूर पदांपैकी 12 वैद्यकीय अधिकारी, 2 नर्स ही पदे भरली गेली आहेत. उर्वरित पदे लवकरच भरण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.