जिल्ह्यात 11 गावातील 32 वाड्यांमध्ये पाणी टंचाई

रत्नागिरी:- जिल्ह्या सध्या 11 गावांतील 32 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे सर्वाधिक चिपळूण तालुक्यात यावर्षी भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे.

यावर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पहिला टँकर लांजा तालुक्यात धावला. सध्या उन्हाळा सुद्धा कडक जाणवू लागला आहे. यामुळे पाणीपातळीत सुद्धा घट होवू लागली आहे. परिणामी पाणी टंचाईने उग्ररुप धारण केले आहे. सध्यातरी 11 गावांतील 32 वाड्यांना टँकरने पाणी पुरवावे लागत आहे.
लांजा तालुक्यातील पालू, हर्दखळे, चिपळूण तालुक्यातील कोंडमळा, कादवड, सावर्डे, कुडप, टेरव, अडरे, आगवे, अनारी, डेरवण या गावातील एकूण 32 वाड्यांतील 8 हजार 465 ग्रामस्थांना टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. यासाठी 1 शासकीय आणि 1 खासगी असे दोन टँकर तैनात करण्यात आले आहे.

यावर्षी पाणी टंचाईसाठी 7 कोटी 80 लाख
जिल्ह्यातील आगामी पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद सज्ज झाले आहे. त्यासाठी जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईसाठी 333 गावांतील 859 वाड्यांचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी 7 कोटी 80 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.