१७८ फेऱ्या ; २२ कर्मचाऱ्यांचे निलंबन
रत्नागिरी:- एसटी कामगारांनी काम बंद आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला तरीही आज जिल्ह्यात ४९१ कर्मचारी हजर झाले. त्यानंतर दिवसभरात १७८ फेऱ्या सोडण्यात आल्याने २६५० प्रवाशांनी एसटीने प्रवास केला. आंदोलन कधी संपणार असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. कर्मचारीसुद्धा कधी हजर व्हायचे, तोडगा निघणार का अशी दबक्या आवाजात चर्चा करत आहेत. कामावर हजर होण्यासाठी कर्मचारी तयार असले तरी प्रशासनाने पुढे येऊन सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज आहे. जिल्ह्यात मंगळवारी २२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आज प्रशासकीय १७७, कार्यशाळा १७९, चालक ६३, वाहक ५० आणि चालक तथा वाहक २२ असे एकूण ४९१ कर्मचारी कामावर हजर होते. तसेच ४६ कर्मचारी अधिकृत रजेवर होते. अद्यापही ३२४२ कर्मचारी बंदमध्ये सहभागी आहेत. आज बंद आंदोलनाचा २३ वा दिवस होता. या महिन्यात फक्त पहिले सात दिवसच कामगार कामावर होते. त्यामुळे आता या दिवसांचेच वेतन कामगारांना मिळणार आहे. परंतु उत्पन्नच नसल्याने वेतन कसे करायचे असा मोठा प्रश्न एसटी विभागीय कार्यालयासमोर आहे.
जिल्ह्यातील ८२८ चालक, ६१८ वाहक आणि चालक तथा वाहक ११३० हे जोपर्यंत कामावर हजर होत नाहीत तोपर्यंत एसटीची चाके थांबलेली राहणार आहेत. परंतु परिवहनमंत्री अनिल परब यांनी वेतन वाढ जाहीर केल्यानंतरही कर्मचाऱ्यांमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. काही कर्मचारी हजर होण्याच्या बाजूने आहेत. परंतु ज्यांनी कमी सेवा बजावली आहे त्यांचा ठाम विरोध आहे. विलीनीकरण झालेच पाहिजे या मागणीसाठी हे कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यांच्यासोबत ज्येष्ठ कर्मचारीही त्यांची बाजू घेत आहेत. जिल्ह्यात काल मंगळवारी २२ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.