रत्नागिरी: गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… या जयघोषात आज अनंत चतुर्दशीदिवशी जिल्ह्यात ३६,७२० घरगुती तर ४८सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चोख बंदोबस्त तैनात केला आहे. कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन होऊ नये यासाठी विसर्जन मिरवणुकांवरील बंदी कायम ठेवली आहे.गेले ११ दिवस जिल्ह्यात मांगल्याचे वातावरण निर्माण झाले होते. गणपतीच्या आगमनाने सर्वत्र नवचैतन्य निर्माण झाले होते. ११ दिवसांच्या पाहुणचारानंतर उद्या अनंत चतुर्दशीदिवशी हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे.यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने सर्वच सण-उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले. गणेशोत्सवाला मात्र परवानगी देण्यात आली. परंतु अत्यंत साध्या पद्धतीने आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. त्यानुसार गणेशोत्सव जिल्ह्यात साजरा झाला. आगमन मिरवणुका तसेच विसर्जन मिरवणुकांवर प्रशासनाने बंदी घातली आहे. त्याचबरोबर विसर्जनावेळी केवळ २ व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. समुद्रकिनारी गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे.
आज जिल्ह्यात ३६,७२० घरगुती तसेच ४८ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. अत्यंत साध्या पद्धतीने हे विसर्जन होणार आहे. पोलीस स्थानकाच्या अखत्यारित येणाऱ्या हद्दीनुसार रत्नागिरी शहर ११७९ खासगी तर ६ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. १५४२ खासगी तर १ सार्वजनिक, जयगड ६९२ खासगी, १ सार्वजनिक, संगमेश्वर ३६१२ खासगी, राजापूर ६०९० खासगी, २ सार्वजनिक, नाटे ४० खासगी, १ सार्वजनिक, लांजा १६४५ खासगी, ३ सार्वनिक, देवरूख ३७९२ खासगी, २ सार्वजनिक, सावर्डे ७७८ खासगी, चिपळूण ६५८२ खासगी, गुहागर ४३५० खासगी, अलोरे १०० खासगी, १ सार्वजनिक, खेड २२०७ खासगी, १३ सार्वजनिक, दापोली २४२५ खासगी, ६ सार्वजनिक, मंडणगड ४१० खासगी, ३ सार्वजनिक, बाणकोट १५० खासगी, पूर्णगड ९६१ खासगी, दाभोळ १७९ खासगी, १ सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन आज केले जाणार आहे.