जिल्ह्यात २ हजार ९२३ बालकांना दिली जाणार गोवर, रुबेला लस 

रत्नागिरी:- राज्यात गोवर आजाराचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे या आजाराच्या प्रतिबंधासाठी आणि डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर या आजाराचे दुरीकरण करण्याचे उद्देशाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १५ ते २५ डिसेंबर आणि १५ ते २५ जानेवारी २०२३ दोन टप्प्यात गोवर, रुबेला विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील २ हजार ९२३ लाभार्थींना लस दिली जाणार आहे.

गोवर, रुबेला विशेष लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील लसीकरण न झालेल्या बालकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामस्तरापासून लसीकरण न झालेल्या बालकांच्या याद्या स्थानिक आशा आणि आरोग्य कर्मचारी यांचेमार्फत तयार करण्यात येणार असून २६ जानेवारी २०२३ पर्यंत या बालकांचे गोवर, रुबेला लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी चार आठवड्याच्या अंतराने दोन मोहिमा आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी विशेष लसीकरण सत्राचेदेखील आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठकही नुकतीच पार पडली. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले, साथीच्या पार्श्वभूमीवर आशा आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येऊन नऊ महिने ते पाच वर्ष वयोगटातील लसीकरणापासून वंचित लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यात येणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी मोहिमेसाठी काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. समाजातील सर्व घटकांनी सजग राहून गोवर, रुबेला या आजाराचा उद्रेक होणार नाही तसेच डिसेंबर २०२३ अखेर गोवर, रुबेला या आजाराचे दुरीकरण हे ध्येय ठेवून समन्वयाने विशेष गोवर लसीकरण मोहीम यशस्वी करावी. लसीकरणापासून वंचित बालकांच्या पालकांनी मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सीईओ पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.