जिल्ह्यात २६ जानेवारीपर्यंत मनाई आदेश

रत्नागिरी:- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २६ जानेवारीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश काढल्याचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवशी यांनी सांगितले.

जिल्ह्यात १४ ला मकर सक्रांत साजरी केली जाणार आहे तसेच २६ जानेवारीला जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन आहे. या दिवशी ठिकठिकाणी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येतात. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.