रत्नागिरी:- दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर मोठ्या उत्साहात कोकणात गणेशोत्सव साजरा होणार आहे. मोठ्या संख्येने चाकरमानी गावी येवू लागले आहेत. कोकणात गणपती म्हटले की सर्वात मोठा सण या सणामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक याठिकाणाहून चाकरमानी मोठया संख्येने आपली हजेरी लावतात. सर्वात जास्त घरगुती गणपती हे कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिसून येतात.
रत्नागिरी जिल्हयामध्ये १ लाख ६७ हजार ८४४ घरगुती गणपती तर १०९ सार्वजनिक गणेशोत्सावाची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामधील ११ हजार ९८४ दीड दीवसांचे गणपती आहेत. घरच्या गणपती बाप्पासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांतून चाकरमानी गावी येतात.
प्रत्येक गावामध्ये कुठे घुंगरांचा आवाज तर कुठे तबल्याची साद ऐकू येते. अनेक ठिकाणी शक्तीवाले व तुरेवाले डबलबारी तर काही ठिकाणी भजनांचा आवाज ऐकू येतो. अनेक ठिकाणी सार्वजनिक आरत्याही कानावर येतात. गौरी गणपतीपर्यंत १ लाख ३४ हजार१०३ घरगुती गणपती तर अनंत चतुर्दशीपर्यंत २१ हजार ७५७ घरगुती व १०९ सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होणार आहेत. अनेक ठिकाणी गणपती सजावट स्पर्धा घेतल्या जातात तर काही ठिकाणी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
गुहागरमधील शृंगारतळीमध्ये ‘शृंगारतळीचा राजा’ व “निळकंठेश्वर” सार्वजनिक गणपतीचे आयोजन केले जाते. गुहागर शहरामध्ये घरगुती गणपतीमध्ये मोठया मोठया मूर्त्यांची स्थापना केली जाते . अनेक ठिकाणी चलचित्र देखावे पाहावयास मिळतात. प्रतिवर्षी वेगवेगळया प्रकारचे चलचित्र साकारले जाते.
गुहागर पोलिस स्थानक, गुहागर महावितरण याही ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. रत्नागिरीमध्ये ‘श्री रत्नागिरीचा राजा, बंदर रोड मित्रमंडळ गणेशोत्सव, टिळक आळीतील सार्वजनिक गणेशोत्सव, शांतिनगरचा राजा तसेच सार्वजनिक बांधकाम शासकीय रुग्णालय नगरपरिषद भूमिअभिलेख पाटबंधारे जिल्हा विशेष कारागृह अशा विविध कार्यालयांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो.