जिल्ह्यात १५ मे पर्यंत पावसाची शक्यता

रत्नागिरी:- हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात १५ मे पर्यंत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऐन आंबा हंगामात हलक्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन तयार आंबाफळांची काढणी करावी, अशी सूचना कोकण कृषी विद्यापीठाकडून करण्यात आली आहे. पावसामुळे नुकसान होण्याच्या भीतीने आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

मागील आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण होते. त्यामुळे पावसाची शक्यता होती; पण वेगवान वाऱ्यामुळे पाऊस पडला नाही; पण या आठवड्यात पावसाची शक्यता असल्यामुळे बागायतदार धास्तावलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता लक्षात घेता तयार आंबाफळांची काढणी देठासह चौदा आणे (८० ते ८५ टक्के) पक्वतेला आली असताना करावी. उन्हाची तीव्रता कमी असताना तसेच पावसाचा अंदाज घेऊन करणे गरजेचे आहे. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साका होऊ शकतो. काढणी झालेले आंबे लगेचच झाडाच्या सावलीमध्ये ठेवावेत. फळमाशीच्या व्यवस्थापनासाठी वादळी वाऱ्यामुळे बागेमधील गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत आणि विद्यापीठाने शिफारस केलेले ‘रक्षक फळमाशी सापळा’ प्रतिएकरी २ या प्रमाणात बागेमध्ये झाडांच्या उंचीप्रमाणे साधारण जमिनीपासून २ ते ३ मीटर उंचीवर राहील, अशा प्रकारे टांगावा. नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच जोडाच्या खाली बुंध्यावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून दोनदा तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसातून दोनदा व तिसऱ्या वर्षी महिन्यातून दोनदा प्रत्येक कलमांना ३० लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी तसेच झाडाच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन करावे. रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्याकरिता रोपांच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावावी तसेच रोपांना वरून सावली करावी, अशी सूचना विद्यापीठाने केली आहे.