जिल्ह्यात १२ हजार ८८५ घरात बसले टीओडी वीजमीटर

रत्नागिरी:- महाराष्ट्रात वीज पुरवठा करणाऱया महावितरण कंपनीकडून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित टी.ओ.डी. (टाईम ऑफ डे) स्मार्ट वीज मीटर वीज ग्राहकांच्या घरात लावल्या जाणार आहेत. टीओडी मीटर हे ग्राहकांना मोफत मिळणार असून यासाठी प्रीपेड चार्जिंग करावी लागणार नाही. या मीटरमुळे वीज दरात सवलत मिळणार असून सध्या सुरू असलेल्या प्रणालीत कोणताही बदल होणार नाही. रत्नागिरी जिल्ह्य़ात आतापर्यंत सुमारे 12 हजार 885 टी.ओ.डी. वीजमीटर बसवण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात वीज परिमंडळात ट्रान्सफॉर्मर आणि वीज केंद्रात उच्चदाब वीज वाहिन्यांसोबत जुळलेल्या ठीकाणात या नव्या तंत्रज्ञानाचे डिजिटल मीटर लावण्याचे काम सध्या सुरू आहे. जिल्ह्य़ात महावितरणचे एकूण सुमारे 6 लाख वीज ग्राहक आहेत. आतापर्यंत जिल्ह्य़ात फीडर उपकेंद्र असलेल्या 330 पैकी 259 ठिकाणी टीओडी वीजमीटर बसविण्यात आले आहेत. ट्रान्सफॉर्मर 8856 पैकी 1651 ठिकाणी, शासकीय कार्यालये असलेल्या 12,248 पैकी 4205 ठिकाणी, नादुरूस्त असलेले 4,388 वीजमीटराच्या ठिकाणी टीओडी वीजमीटर लावण्यात आले आहेत. तसा नवीन कनेक्शन घेतलेल्या 1 हजार 316 ग्राहकांना हे वीजमीटर देण्यात आले आहेत.
या स्मार्ट वीजमीटरमुळे कोणत्या ठिकाणी ट्रासफार्मर किंवा डीपीमध्ये टेक्निकल बिघाड झाला तर यातून त्या विभागातील संबंधित इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि महावितरणच्या कर्मचाऱयांना लगेचच याची माहिती मिळणार आहे.

परिणामस्वरूपी भविष्यात वेळोवेळी वीज पुरवठा खंडित राहण्याचा कालावधी फार कमी होईल. या वीज मीटरमुळे वीज ग्राहकांना नवीन वीज जोडणी साठी सदोष आणि नादुरुस्त मीटर बदलविण्यासाठी आता हेलपाटे घ्यावी लागणार नाही. महावितरण कंपनीकडून आता नवीन विज मीटर जोडणी साठी आणि सदोष तसेच नादुरुस्त वीज मीटर बदलताना आता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित टीओडी वीज मीटर ग्राहकांना मोफत दिल्या जाणार आहे.
विशेष म्हणजे हे मीटर सध्याच्या मीटर प्रमाणेच पोस्टपेड असे हे टीओड मीटर राहणार आहे. यातून वीज वापरानंतरच दर महिना वीज बिल अदा करावे लागणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांसाठी सध्याच्या बिलिंग प्रणाली मध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. या नव्या टीओडी मीटर मुळे वीज ग्राहकांना वीज वापर करताना नियमितपणे आपल्या मोबाईल फोनवर रीडिंग आणि युनिट समजणार आहे. हे वीज मीटरसाठी एनसीसी या कंपनीची सेवा पुरवठय़ासाठी निविदा प्रक्रियेतून निवड झालेली आहे.

सध्या नवीन वीज जोडणी सदोष आणि नादुरुस्त ठिकाणी हे नवे मीटर लावण्यात येत आहे. या सर्व फायद्यांमुळे वीज ग्राहकांनी गैरसमज न ठेवता आणि कोणतीही प्रीपेडची सक्ती नसलेल्या नव्या तंत्रज्ञानावर आधारित टीओडी मीटर आपल्या घरात बसविण्यासाठी महावितरण ला सहकार्य करावा, असे आवाहन य कंपनीने केले आहे.

या नव्या टीओडी डिजिटल वीज मीटर प्रणालीमुळे वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे अचूक आणि ऑटोमॅटिक युनिट रीडिंग होणार आहे. सर्व वीज ग्राहकांना आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वर विजेचे मीटर रिडींग प्रत्येक मिनिटाला पाहण्याची सुविधा या मीटरमध्ये असेल. यामुळे दरमहा वीज बिल प्रक्रिया आणखी अचूक होईल. यातून वीज मीटरचा अस्पष्ट फोटो घेणे विविध कारणांमुळे मीटर रिडींग घेता न येणे नादुरुस्त रिमार्क मुळे सरासरी किंवा अंदाजानुसार युनिट वीज बिल पाठविणे हे सर्व प्रकार बंद होणार आहे. त्यामुळे चुकीच्या वीज बिलांमुळे वीज ग्राहकांना नेहमी होणारा मनस्ताप ही टळेल. दिवसात कमी वेळेत वीज वापरल्यास सवलतही मिळणार आहे.