रत्नागिरी:- मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यात ११ हजार ३२६ आंबा बागायतदारांची कर्ज थकित आहेत. त्यांची सुमारे २२३.८६ कोटी रुपये थकित आहेत. त्या शेतकर्यांचा सहानभूतीपूर्वक विचार करुन आंबा, काजू, नारळ, सुपारी बागायतदारांची संपूर्ण कर्ज सरसकट माफी करणे गरजेचे आहे. तर नियमित असणार्या कर्जदारांना त्यांना व्यवसायात उभे राहण्यासाठी मिनी पॅकेज मिळाले पाहीजे यासह दहा मागण्या प्रजासत्ताक दिनी करण्यात येणार्या आंदोलनात शासनापुढे मांडण्याचे जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी निश्चित केले आहे.
कोकण हापूस आंबा उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादित रत्नागिरी आणि ओबीसी संघर्ष समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारीला मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलनाचे करण्यात येणार आहे. यामध्ये २०१५ पासून थकित कर्ज असलेल्या शेतकार्यांचा ७/१२ कोरा करावा अशी मागणी केली जाणार आहे. जिल्ह्यात कृषी संशोधनासाठी सुसज्ज प्रयोगशाळा स्थापन करावी. पीक विम्याचा कोकणातील शेतकर्यांना लाभ मिळत नाही, त्यासाठी तापमान मोजणी यंत्र तलाठी सजाला दोन बसवावीत. एक डोंगराळ व एक सपाटी भागास तसेच विम्याचे निकष बदलून, निकष ठरविताना शेतकरी प्रतिनिधी घ्या. अवकाळी पावसाचा कालावधी १ नोव्हेंबर ते ७ जूनपर्यंत अपेक्षित आहे. कर्जमाफी मिळेपर्यंत थकित शेतकर्यांवरील जप्तीची कारवाई तात्काळ थांबवा. लोक अदालतमध्ये प्रकरणे चालू आहेत, त्यांची व्याजे थांबवून रकमा भरण्यासाठी सवलती द्यावी आणि शेतकर्यांना व्यवसायाला उभे राहण्याकरीता नवीन कर्ज उपलब्ध करुन द्या. शून्य वीज चोरी असलेल्या कोकणात पूर्वीप्रमाणे शेतकर्यांना योग्य कृषि वीज बिले द्यावीत. भरमसाठ वीज बिले पाठविणेत बंद करावे. आंबा हे पिक नाशीवंत माल असल्यामुळे या पीकांना हमी भाव मिळावा.
चालू हंगामात फळमाशीचा मोठ्या प्रमाणात प्रार्दुभाव झाला व मोठ्या प्रमाणात आंबा नाशीवंत झाला त्याचा सर्व्हे करुन नुकसान भरपाई मिळावी. यावर संशोधन करुन उपाययोजना करुन शेतकर्याला दिलासा द्यावा. बँकेकडून शेतकर्यांना आंबा, काजू, नारळ व सुपारी उत्पादनांना कमी व्याजदरात कर्जे द्या. कोकणातील आंब्यांचे माकडांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. माकडांचा कायम स्वरुपी बंदोबस्त करावा. कोकणातील शेतकर्यांचे मुख्य पीक असून कोकणची अर्थव्यवस्था या पीकांवर अवलंबून आहे. तरी कोकणातील आंबा बागायतदारांची कर्जमुक्ती द्या अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. या आंदोलनात डॉ. विवेक भिडे, प्रकाश साळवी, नंदकुमार मोहिते, साक्षी रावणंग, प्रदिप सावंत, मन्सूर काझी, सुरेंद्र कारेकर, वसंत आंबेलकर यांच्यासह सर्व बागायतदार उपस्थित राहणार आहेत.