रत्नागिरी:- हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार १० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ८) साखरप्यासह काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर दिवसभर ढगाळ वातावरण होते. याचा परिणाम हापूसवर होणार असून आंबा काढणी करताना बागायतदारांना काळजी घ्यावी लागणार आहे. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याची शक्यता आहे, तर वातावरणातील बदलांमुळे बुरशीजन्य रोगांसह किडींचा प्रादुर्भाव होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारनंतर जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये पाऊस झाला. दुपारपर्यंत वातावरण व्यवस्थित होते, मात्र सायंकाळी ढग भरुन आले. किनारी भागात गार वारे वाहू लागले होते. साखरप्यासह संगमेश्वर, लांजा पट्ट्यात पावसाची नोंद झाली. आंबा हंगाम मध्यात आलेला असतानाच अवकाळी पावसाने बागायतदारांची त्रेधातिरपिट उडवली आहे. एप्रिल महिन्यात उत्पादन कमी असून मे महिन्यात शेवटचे काही दिवस मोठ्याप्रमाणात आंबा येईल अशा आशेवर बागायतदार आहेत. पण अधुनमधून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे फळ गळ, बुरशीसह दर्जाहीन फळांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन बागायतदारांनी काढणीचे वेळापत्रक ठरवावे अशा सुचना कोकण कृषी विद्यापिठाकडून एका पत्रकाद्वारे केल्या आहेत. आंबा काढणी करताना देठासह चौदा आणे (८० ते ८५ टक्के) परिपक्व असेल्याची काळजी घ्यावी. उन्हाची तीव्रता कमी असताना आणि पावसाचा अंदाज घेवून काढणी करावी. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याची शक्यता आहे. यासाठी काढणी झालेले आंबे लगेचच झाडाच्या सावलीत ठेवावेत. फळकूज या काढणी पश्चात बरशीजन्य रोगापासून आंबा फळांचे संरक्षण करण्यासाठी फळांची काढणी देठासह करावी. तसेच काढणीनंतर फळे पोटॅशियम मेटाबायसल्फाईट ०.०५ टक्के (०.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी) या रसायनाच्या ५० अं.सें. उष्णजल द्रावणात १० मिनिटे बुडवून नंतर फळे पिकविण्यासाठी ठेवावीत, असे विद्यापीठाने सुचवले आहे.