जिल्ह्यात सातशे पथकांकडून होणार जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीचे सर्वेक्षण 

 ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहीमेला सुरुवात

रत्नागिरी:-कोरोनाने होणार्‍या मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्ह्यात राबविण्यात येणार्‍या ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहीमेंतर्गत सातशे पथके निश्‍चित केली आहेत. आज पासून प्रत्यक्षात कार्यवाही सुरू झाली आहे. एक पथक साडेसातशे कुटूंबांचा सर्व्हे करावयाचा आहे. कोरोनाशी निगडीत लक्षणे आढळणार्‍यांना तत्काळ गृहविलगीकरणात ठेवले जाणार आहे.

राज्य शासनाने कोरोना रुग्ण शोधण्यासाठी माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहीम हाती घेतली होती. त्यामध्ये गावपातळीवर जाऊन सर्व्हे करण्यात आला. याच आधारावर जिल्हाप्रशासनाने रुग्ण शोध मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत 661 जणांचा मृत्यू झाला असून एप्रिल महिन्यात सर्वाधिक नोंद आहे. रुग्ण शोध मोहीमेसाठी जिल्ह्यात सातशेहून अधिक पथके तयार केली आहेत. यामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका किंवा मदतनिस, स्वयंसेवक, ग्रामकृतीदलाचा सदस्य यांचा समावेश असेल. त्यांच्या मदतीला शिक्षक, ग्रामसेवक किंवा तलाठी यांची नेमणूक केली जाईल. गावाच्या लोकसंख्येनुसार त्या पथकात तिन किंवा पाच सदस्य राहतील. ऑक्सीजन लेवल 95 च्या खाली आणि संबंधिताला लक्षणे असतील त्यांची यादी तयार करुन पथकातील सदस्य उपकेंद्राकडे पाठवितील. तोपर्यंत त्यांना घरीच विलगीकीकरणात ठेवले जाईल. गंभीर आजारी असलेल्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी आणि उपचारासाठी पाठविले जाईल.
होम आयसोलेशन किंवा रुग्णालयातून दहा दिवसानंतर सात दिवस घरी असलेल्या व्यक्तींनी स्वतःची काळजी घ्यावयाची आहे. कुटूंबातील इतर व्यक्तींपासून दूर रहावे, सकस आहार घ्यावा, पल्स ऑक्सीमीटरने ऑक्सिजन पातळी दर चार तासांच्या अंतराने तपासावी. गृह अलगीकरणातील व्यक्तींनी सहा मिनीटे वॉक टेस्ट करावी असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.