रत्नागिरी:-कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून 59 केंद्रांवर कोरोना लसीकरणाची मोहीम सुरु आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यातील 28 हजार 221 जणांना लस देण्यात आली असून दुसर्या टप्प्यातील 7 हजार 547 जणांना लस दिली आहे.
जिल्ह्यात 16 जानेवारीपासून फ्रंटलाईन कोरोना योध्द्यांना लसीकरणात सहभागी करून घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात पंधरा हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचार्यांची यादी शासनाला सादर केली होती. या यंत्रणेतील अधिकारी, कर्मचार्यांनाही लस घेण्याचे आवाहन प्रशासनस्तरावरून करण्यात आले. आरोग्य यंत्रणेतील शासकीय, खासगी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय तसेच आरोग्य सेवक-सेविकांकडून प्रतिसाद कमी मिळाला. लसीकरणाच्या यादीत नाव असलेल्या 15,773 आरोग्य कर्मचार्यांपैकी 9 हजार 422 जणांनी लस घेतली. महसूल, पोलीसांपैकी 23 टक्के कर्मचारीच लसीकरणासाठी पुढे आले. महसूलमधील 1 हजार 20 जणांची तर पोलीसांमधील 1 हजार 717 जणांची यादी होती. सध्या प्रौढ, ज्येष्ठ नागरिकांसह कोमोर्बीड रुग्णांना लस दिली जात आहे. 1 मार्चपासून 45 ते 59 वयोगटातील लोकांसाठी लसीकरणात समावेश केला आहे. 60 वर्षे वरील ज्येष्ठांमध्ये एकूण साडेपाच हजार लोकांनी कोविड व्हॅक्सीनचा डोस घेतला आहे. लसीकरणासाठी सुमारे 83 हजार जणांनी नोंदणी केली होती. पहिल्या दोन टप्प्यात पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी आवश्यक केली होती. सध्या पोर्टलसह प्रत्यक्षात केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याची सुविधा दिली आहे. त्याला प्रतिसाद चांगला मिळत आहे. जिल्ह्यात 38 प्राथमिक आरोग्य केंद्र, 14 ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्र व उपजिल्हा रुग्णालये तर 7 खासगी रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरु आहे. लोकांना जवळच्या जवळ सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.