रत्नागिरी:- पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत यंदा लोकसहभागातून आतापर्यंत 2 हजार 769 बंधारे उभारण्यात यश आले आहे. एका बंधार्यासाठी सरासरी पाच हजार रुपये खर्च येतो. श्रमदानामुळे सुमारे सव्वा कोटी रुपयांची बचत झाली असून पाणी योजनांच्या स्रोतांची पातळी वाढली आहे.
पाण्याची बचत व साठवण न केल्यास त्याचे दुरगामी परिणाम उन्हाळ्याच्या अखेरीस दिसून येतात.
त्यासाठी पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते साठवणे हाच एकमेव पर्याय आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. नद्या, नाल्यांचे पाणी वाहत समुद्राला मिळते. ते पाणी अडवले तर त्याचा उपयोग होऊ शकतो. अडवलेले पाणी मुरून पातळी वाढते. यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून गेली पाच वर्षे श्रमदानातून कच्चे बंधारे उभारले जात आहेत. त्यासाठी लागणार्या सिमेंटच्या पिशव्यांचा खर्चही लोकसभागातून केला जातो. बंधारे बांधण्यासाठी गावातील लोक एकत्र येऊन श्रमदान करत असल्याने तो खर्च वाचतो. सरासरी एका बंधार्याला पाच हजार रुपये येतो. शासनाचे कोट्यावधी रुपयांची बचत दरवर्षी होत आहे.
यंदा उशिरापर्यंत पाऊस थांबल्यामुळे डिसेंबर अखेरपर्यंत वाहत्या पाण्याचा जोर अधिक होता. त्यामुळे बंधारे उभारण्याच्या कामाला उशिरा सुरवात झाली. याचवेळी ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु होती. जिल्हा परिषदेकडून प्रत्येक ग्रामपंचायतीत पाच बंधार्यांचे लक्ष निश्चित करुन दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात साडेचार हजार बंधारे अपेक्षित होते; परंतु तुलनेत पावणेतीन हजार बंधारेच बांधले गेले. टंचाईची तिव्रता कमी असली तरीही साठलेल्या पाण्याचा उपयोग पिण्याच्या व्यतिरिक्त गुरांसाठी, कपडे धुण्यासाठी, भाजीपाला लागवडीला होत आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना असलेल्या ठिकाणी बंधारे बांधल्यामुळे विहिरींची पाणी पातळी स्थिरावली आहे.