रत्नागिरी:- कोरोनामुळे 1 ली व 2 रीतील अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष अध्यापनापासून दूर राहिले आहेत. तसेच येऊ घातलेल्या शैक्षणिक वर्षात अंगणवाडीतून पहिली येणार्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेची भिती राहू नये, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी पालकांच्या सहकार्याने घरातच धडे घेतले जात आहेत. अंकज्ञानासह अक्षर ओळख याद्वारे होत आहे. अंगणवाडीसेविकांसह प्राथमिक शिक्षकांच्या मदतीने जिल्हा परिषदेने आतापर्यंत 37 हजार विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे.
कोरोनामुळे 2020-21 च्या शैक्षणिक वर्षात पहिली प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत बसण्याची संधीच मिळाली नाही. त्यांचा प्रवेश फक्त हजेरी पटावरच राहीला. सलग दुसर्या वर्षीही तीच परिस्थिती आहे. यंदा श्रीगणेशा करणार्यांसह पहिलीमधून दुसरीत गेलेल्यांनाही शाळेत बसून शिकण्याची संधीच मिळणार नाही. कोरोनामुळे मुलांमधील शिकण्याच्या उत्साहावर पाणी फेरले गेले आहे. तो आत्मविश्वास जागृत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या शाळा पूर्व तयारीच्या उद्देशाने पहिलं पाऊल हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, अंगणवाड्यांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला. ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आणि प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनने मांडली. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्यासह सर्व पदाधिकार्यांनी पाठबळही दिले. गेल्या महिन्याभरात अंगणवाडीसेविका, शिक्षकांनी पालकांशी संपर्क साधत मुलांना घरच्या घरीच धडे देण्यास प्रोत्साहीत केले.पालकांनी विद्यार्थ्यांशी नियमित संवाद साधताना ही शिकवणी घ्यावयाची होती. अनेकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुरवातीला कुटूंबातील माणसांची ओळख, दैनंदिन वापराच्या वस्तूंची नावे व त्याचे उपयोग, रंग ओळखणे, चित्र ओळखणे, कृतीमधून खेळ शिकणे या गोष्टी करवुन घेण्यासाठी पालकांना प्रोत्साहन दिले गेले. कागदापासून होडी बनविणे, चित्रांविषयी माहिती सांगणे हे मुले स्वतःहून करत आहेत. न घाबरता बोलता यावे यासाठी मुलांमध्ये आत्मविश्वास दिला जात आहे. अंगणवाडीतून पहिली येणार्यांना 1 ते 10 अंकांची ओळख, अक्षरांची ओळख, उभे राहून शिक्षकांपुढे बोलता येणे, रंगसंगती व चव ओळखणे, वस्तूंच्या जोड्या लावणे, बोटांच्या साह्याने बेरीज-वजाबाकीची आकडेमोड विद्यार्थी करत आहेत. नऊ आठवड्यांच्या या कार्यक्रमात 70 टक्केहून अधिक विद्यार्थ्यांनी घरबसल्याच पालकांच्या मदतीने यात सहभाग घेतला आहे.