गुढीपाडव्याचा साधला मुहूर्त; एका दिवसात १६५ वाहनांची नोंदणी
रत्नागिरी:- गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून जिल्ह्यात जोरदार वाहन खरेदी झाली. बुधवारी (ता.२२) एका दिवसात १६५ नवीन वाहनांची खरेदी झाल्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे झाली आहे. आरटीओ कार्यालयाला टॅक्सच्या माध्यमातून ३१ लाख १३ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. वाहनखरेदीतील ही उलाढाल साधारण २० ते २५ कोटीच्या घरात गेली आहे.
लोकांचे राहणीमान उंचावल्याने वाहनखरेदी उद्योगाची चांगलीच चलती आहे. हौसेला मोल नसल्याने नागरिक व्यक्तिशः हौस पूर्ण करण्यासाठी कितीही मोठी रक्कम मोजमाना दिसत आहेत. त्यात फायनान्स कंपन्यातर सहज कर्ज उपलब्ध करून दिले जात आहेत. १०० टक्के कर्ज प्रकरण होत असल्याने आलिशान आणि विविध कंपन्यांच्या वाहनांची जिल्ह्यात जोरदार खरेदी झाली आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक म्हणून गुढीपाडव्याला लोक वाहन, सोने, घर आदींची खरेदी केली जाते. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळालेल्या नोंदणीनुसार, जिल्ह्यात पाडव्याला १६५ वाहनांची खरेदी झाली आहे.
रत्नागिरीत विविध कंपन्यांची शोरूम आहेत. या एजन्सींच्या माध्यमातून महिन्याला ३० ते ४५ च्या दरम्यान वाहनांची विक्री होते. एका कंपनीची उलाढाल महिन्याला ४ ते ५ कोटीवर झाली. त्यामुळे वर्षाचा विचार केला तर वाहनखरेदी उद्योगामध्ये अब्जावधीची उलाढाल होत असल्याचे दिसते.
दुचाकी, कार, रिक्षा, जेसीबी, ट्रक आदींचा समावेश आहे. सर्वांत जास्त १३२ दुचाकींची खरेदी झाली आहे. त्यानंतर १६ रिक्षा, १३ कार, १ जेसीबी आणि ३ ट्रकची खरेदी झाली आहे. या वाहनांच्या आरटीओ कार्यालयात नोंदणी झाल्यानंतर टॅक्सच्या माध्यमातून आरटीओ कार्यालयाला ३१ लाख १३ हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. प्रत्यक्ष वाहनांच्या खरेदीचा विचार केला तर दुचाकी स्प्लेंडर खरेदी केली तर ती १ लाख २० हजाराच्या दरम्यान जाते. त्या तुलनेत जास्त सीसीच्या बाईक आणखी महागड्या झाल्या आहेत. बुलेटची क्रेज असल्याने त्याची किंम्मत सव्वादोन लाखाच्या दरम्यान आहे. कारचा विचार केला तर ८ लाखापासून पुढे आहेत. जेसीबी ३० ते ३५ आणि ट्रकची किंमत देखील याच दरम्यान जाते. वाहनांचा ऑनरोड प्राईजचा विचार झाला तर वाहनखरेदीची ही उलाढाल २० ते २५ कोटींवर गेली आहे.