रत्नागिरी:- जिल्ह्यात वनविभागाची व्याघ्र गणना गुरूवारपासून (ता. २३) सुरू होणार आहे. जिल्ह्यातील पाणवठ्यावर प्रत्यक्ष जाऊन ही गणना केली जणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात किती बिबटे, ब्लॅक पॅंथर आहेत याचा अंदाज वनविभागाला येणार आहे. त्याचबरोबर वानर, माकडांचीही गणना होणार आहे. त्यानंतर त्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे. वनविभागाच्या अंदाजानुसार सुमारे आठ ते दहा किमी अंतरावर एक बिबट्या असावा, असा अंदाज आहे. बिबट्यांचा अधिवास धोक्यात आल्यामुळे मानवी वस्तीमध्ये त्यांचा वावर दिसतो. भक्ष्याच्या शोधात ते मानवी वस्तीपर्यंत पोहचले आहेत. जिल्ह्यात आता किती बिबटे आहेत याची गणना व्याघ्र गणनेमध्ये होणार आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यातून अनेक वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात लांजा, देवरूख, राजापूर आदी भागात पायथ्याशी उतरत आहे. समूहशेतीचा उपक्रम अनेक गरजूंनी सुरू केला आहे. त्यामुळे या भागात हे वन्यप्राणी मोठ्या संख्येने येतात. त्याबाबत वनविभागाकडे काही शेतकऱ्यांनी तक्रारीही केल्या आहेत. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान हे वन्यप्राणी करत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून वानर, माकडांचा मोठा उपद्रव शेतकऱ्यांना होत आहे. त्यांची टोळी शेतात, बागायतीची नासधूस करते. त्यांना पकडण्याच्यादृष्टीने वनविभागाने पावले टाकली आहेत. सुरवातीला या वानर किंवा माकडांची गणना केली जाणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला देऊन त्यांना पकडून निर्बिजीकरण करण्याचा प्रयत्न वनविभागाचा आहे. वनाधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.