रत्नागिरी:- लम्पी आजाराने सर्वत्र थैमान घातले असताना रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराने 323 गावातील 1,296 जनावरे बाधित झाली. त्यापैकी 525 जनावरे या आजारमुक्त झाली असून 136 गुरांचा मृत्यू ओढवला आहे. आतापर्यंत लागण झालेली 50 टक्के जनावरे लम्पीमुक्त करण्यात पशुसंवर्धन विभागाला यशस्वी झालेला आहे.
प्रामुख्याने खेड मध्ये सर्वाधिक 405 तर संगमेश्वरमध्ये 301 गुरांना याची लागण झाली. त्या खालोखाल चिपळूण, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यातही गुरांना लम्पीची लागण बऱयापैकी होताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. गुरांवरील या आजाराच्या विळख्यात आतापर्यंत 21 डिसेंबरपर्यंत 323 गावांतील 681 गायी तर 615 बैल बाधित झालेले आहेत. त्यापैकी 294 गायी व 231 बैल लसीकरणानंतर लम्पीमुक्त झाले आहेत. लम्पीच्या आजाराने जिल्ह्यात आतापर्यंत गायी 71 तर बैल 56 व 9 वासरांचा मृत्यू ओढवला आहे. त्यामध्ये खेडमध्ये 48, चिपळूणमध्ये 21, संगमेश्वरमध्ये 32, गुहागर 1, रत्नागिरी 8, लांजा 12, राजापूरमध्ये 14 गुरांचा समावेश आहे.
पशुसंवर्धन विभागाने या आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गुरांच्या लसीकरणाची जोरदार
मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत 1 लाख 95 हजाराहून अधिक गुरांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. पशुसंवर्धन विभागाकडे पुरेसा औषधसाठा आहे. त्यामुळे गुरांमध्ये आजार दिसून आल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अभिजित कसालकर यांनी केले
आहे.