रत्नागिरी:- जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात सुरू झाला आहे. रत्नागिरी आणि लांजा या तालुक्यांमध्ये ४३ जनावरे लम्पीग्रस्त झाली आहेत. आठवडाभरात लम्पीने तीन जनावरांचा बळी घेतला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाची धावपळ सुरू झाली असून, अन्य ७ तालुक्यांमध्ये सतर्कता बाळगण्यात येत आहे.
जिल्ह्यात १ लाख २० हजार ६०४ गायवर्गीय जनावरे आहेत. त्यामध्ये ५१,३९९ गायी, ५९,४८० बैल आणि ९,७२५ वासरे यांचा समावेश आहे. पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. शासनाकडून जिल्ह्यात जनावरांना देण्यात येणाऱ्या लसींची कमतरता पडू नये, यासाठी २ लाख ३५ हजार लसींचा पुरवठा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आला आहे आणि लसीकरणावर भर दिला जात आहे. आतापर्यंत १ लाख १४ हजार ६१६ जनावरांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. जिल्ह्यातील ३,२०० जनावरांना लम्पीने ग्रासले होते. त्यापैकी ४७९ जनावरे लम्पीने दगावली होती. या लम्पीने दगावलेल्या जनावरांच्या मालकांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येत होती. आतापर्यंत जिल्ह्यातील ३९७ मृत जनावरांच्या मालकांना शासनाकडून हजारो रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे.
जिल्ह्यात लम्पीने डोके वर काढल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील २६ जनावरांना तर लांजा तालुक्यातील १७ अशा एकूण ४३ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. त्यापैकी रत्नागिरीतील २ तर लांजातील एक जनावर लम्पीने मृत्युमुखी पडले आहे. पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. लागण झालेल्या जनावरांवर त्वरित उपचार करण्याचे आवाहन जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून पशुपालक, शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे. तसेच जनावरांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.