व्हेंटिलेटरसाठीची प्रतीक्षा बेततेय जीवावर
रत्नागिरी:-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच व्हेंटिलेटर बेडची कमतरता उपचारातील अडचणीचा विषय बनलेला आहे. व्हेंटिलेटरसाठी रत्नागिरीतील दोन्ही शासकीय रुग्णालयात रुग्णांना ‘वेटिंग’ वर रहावे लागत आहे. बेड रिकामी होईपर्यंतची प्रतिक्षा रुग्णांसाठी जीवघेणी ठरत आहे. याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधी गांभिर्याने पाहणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा तडाखा रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून मृत्यूचा दर दिवसाला वाढतच आहे. वृद्धासह तरुणांचाही कोरोनामुळे मृत्यू होत आहे. बाधित उशिराने दाखल होत असल्याचे कारण आरोग्य यंत्रणेकडून दिले जात आहे. ते कारण काही अंशी योग्य असले तरीही जिल्हा शासकिय रुग्णालयातील व्हेंटिलेटर बेडची अपुरी संख्या हा सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. रुग्णांच्या संख्येनुसार व्हेंटिलेटर बेडस् उपलब्ध होत नसल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. अनेक गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर बेडसाठी वेटिंगवर राहावे लागत आहे.
मंगळवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन पातळी कमी झालेल्या रुग्णांची वेटिंग लिस्ट तयार केली गेली. बेडस् नसल्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून रुग्णांच्या नातेवाईकांना ‘तुम्हाला कुठे व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाला तर रुग्ण तिकडे हलवा’ असे सांगत आहे. दररोज 10 ते 15 रुग्ण वेटींगवर राहत आहेत. त्यातील काहीजणं खासगी रुग्णालयांकडे वळतात. तर काही प्रतिक्षा करतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन ही अत्यावश्यक सेवा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.