रत्नागिरी:- नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मॅनडौंस चक्रीवादळाच्या प्रभावाने किनारपट्टी भागात मळभी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे 15 डिसेंबरपर्यंत कोकण किनारपटी भगातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळीही रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात हलका पाऊस झाला.
गेला आठवडाभर हा मळभाचा सेसेमिऱा बागायतदरांचा पिच्छा करत आहे. त्यामुळे मोहरलेल्या कलमांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भावाने बागायतदार धास्तावले आहेत. दरम्यान , एन डिसेंबरच्या मध्यावरील कोकणातील या पावसाळी स्थितीने किनारी भागात राहणार्या नागरिकांसह, मच्छीमारांना तसेच जिल्ह्यातील बागायतदार- शेतकरीर्यांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
रविवारी कोकणातील रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यातील बहुतांश भागात रिमझिम पाऊस झाला आहे तर रत्नागिरीत सोमवारी सकाळी पावसाच्या मध्यम सरींनी हजेरी लावली होती. रविवारी रात्रीही रत्नागिरी तालुक्यात पावसाचा हलका शिंतेडा झाला. ऐन डिसेंबरच्या मध्यावर थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट घोगांवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 15 डिसेंबरपर्यंत उत्तर मध्य महाराष्ट्रासह कोकण पट्ट्यात पावसाची शक्यता आहे. तुरळक हलक्या पावसासह ढगाळ वातावरण राहील.
मागील आठवड्यात तापमानात चढ-उतार होता. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होते. मात्र दोन दिवसांत मतलई वारे वाहू लागल्यानंतर पारा घसरू लागला तो जेमतेम दोन दिवस टिकला. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पोषक वातावरणामुळे आंबा बागायतदारांना दिलासा मिळणार, पालवीला लवकरच मोहोर फुटण्याच्या आशा वाटत असतानाच मागील आठवड्यात उष्मा वाढल्यामुळे मोहोरावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मोहोर वाचवण्यासाठी आंबा बागायतदारांकडून आता अतिरिक्त फवारणीचा जुळवाजुळव सुरू झाली आहे.