जिल्ह्यात मुसळधार पाऊस; दापोली, चिपळूणला सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी:- वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण शहरात पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा एकदा भीतीचे सावट आहे. चिपळूणमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

त्याचवेळी दापोलीलाही पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.सध्या पाणी ओसरलं असलं तरी पावसाची संततधार सुरूच आहे. दुपारी पुन्हा भरती असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुन्हा पाणी साचणार नाही ना असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन गणपती उत्सवात नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.

सोमवारी सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुन्हा पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चिपळूण नगरपरिषदेनेही धोक्याचा इशारा दिला आहे. येत्या चार दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे असं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलंय. कोकणात सध्या मोठ्या प्रमाणात भाविक गणेशोत्सवासाठी जाच आहेत. त्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दापोलीला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे दापोली बाजापेठ,केळस्कर नाका,तहसील कार्यालयात पाणी साचलं आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन पुरतं विस्कळीत झालयं. दापोलीकरांना अख्खी रात्र जागून काढावी लागली आहे. दापोलीत ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.