जिल्ह्यात मुसळधार; खेड, चिपळूण, संगमेश्वरसह राजापुरात पुरस्थिती

रत्नागिरी:- मुसळधार पावसाने बुधवारी जिल्ह्याला पावसाने झोडपले. यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून जगबुडी, वाशिष्ठी नदीला आलेल्या पुरामुळे पाणी खेड व चिपळूण शहरातील विविध भागांमध्ये घुसले असून दोन्ही शहरे पाण्याच्या विळख्यात आहेत. पावसामुळे परशुराम व कुंभार्ली या दोन घाटात दरडी कोसळल्याने महामार्ग काहीकाळ बंद ठेवण्यात आला होता. चिपळूणमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले होते.

पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर भागात नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली आहे. गेले दोन दिवस उत्तर रत्नागिरीला पावसाने झोडपून काढले आहे. खेडची जगबुडी नदी तर मंगळवारी सायंकाळपासून इशारा पातळीच्या वरती वाहत होती. रात्रीपासून धोका पातळीवर वाहणार्‍या जगबुडी नदीने पहाटेनंतर पुराची पातळी ओलांडली होती. यात मच्छीमार्केट परिसरात पाणी घुसले होते. तर नारंगी नदीला आलेल्या पुरामुळे दापोली-खेड रस्ता बंद ठेवण्यात आला होता. खेड नगर पालिका हद्दीत पाच बोटी तैनात करण्यात आला असून 35 कुटुंबातील 80 जणांना सुरक्षित हलवण्यात आले आहे. तळवट खेड व तळवट जावळी परिसराला जोडणार्‍या पुलावरुन पाणी जात असल्याने येथील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

खेडप्रमाणेच चिपळूणलाही यावर्षी पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गाळ उपशामुळे यावेळी बर्‍यापैकी पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. यावेळी वाशिष्ठी व शीव नद्यांच्या परिसरातील नाईक कंपनी, ओसवाल शॉपी, वडनाका, मुरादपूर, सांस्कृतिक केंद्र व पेठमाप परिसरात पाणी भरले होते. चिपळूणमध्ये एनडीआरएफ पथकासह तलाठी व पोलिसांची सहा पथके वरिल ठिकाणी तैनात करण्यात आली होती. चिपळूणात एका कुटुंबातील तीन व्यक्तींना अन्यत्र स्थलांतरीत करण्यात आले.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी चिपळूण व खेडमध्ये पाणी भरल्यानंतर या भागांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी अधिकारी व कर्मचार्‍यांसह एनडीआरएफच्या जवानांना सूचना केल्या. परशुराम घाटात रस्त्यावर आलेल्या दरडीची पाहणी केली व अधिकार्‍यांकडून माहिती घेतली. यावेळी दोन्ही बाजुची वाहने बंद ठेवण्यात आली होती. सायंकाळी उशिरापर्यंत दरड बाजूला करण्याचे काम सुरु होते.

रत्नागिरी-साताराला जोडणार्‍या कुंभार्ली घाटात सकाळी दरड आल्याने रस्ता बंद ठेवण्यात आला होता. दुपारनंतर दरड बाजुला केल्यानंतर दोन्ही बाजुकडील वाहतूक सुरु करण्यात आली.
राजापूरमधील कोदवली नदीही इशारा पातळीच्यावरती वाहत होती. दर बावनदी, मुचकुंदी, काजळी, सोनवी व शास्त्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. संपूर्ण जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.