जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; रत्नागिरीकरांची उकाड्यातून सुटका

रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्ह्यात गुरूवारी मध्यरात्री पासून मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. शुकवारी दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. दरम्यान पुढील दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यातील आंबा हंगामात गुंतलेल्या आंबा बागायतदारांत निराशा पसरली.

पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्रात पोहोचणार आहे. सध्या मोसमी वाऱयांचा प्रवासाला अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱया वायांच्या प्रभावामुळे सध्या देशातील पूर्वोत्तर भाग आणि दक्षिणेकडील राज्यांत काही भागात जोरदार पूर्वमोसमी पाऊस होत आहे. महाराष्ट्रातही काही भागात पावसाची हजेरी लागलेली आहे. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

यंदा नियोजित वेळेपेक्षा तब्बल सहा दिवस आधी म्हणजे 16 मे रोजी मोसमी वारे सक्रिय झाले. मान्सून अंदमानात दाखल झाला. त्याचा परिणाम पूर्वमोसमी पावसाच्या वातावरणाने साऱयांना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी जिह्यात गुरूवारी रात्रीपासून मान्सूनपूर्व सरींची रिपरिप सुरू झाली. यादिवशी मध्यरात्रीपासुन शुकवारी पहाटेपर्यंत अनेक भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. यादिवशी सकाळपासून अगदी दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यासह अन्य भागातही पावसाने साऱयांना सुखद दिलासा दिला. पण अंतिम टप्प्यात असलेला आंबा हंगाम आटोक्यात आणण्यासाठी धावपळ करणाऱया बागायतदारांची या पावसाने चांगलीच त्रेधातिरपीट उडाली आहे. शुकवारी दिवसभर या पावसाचे ढगाळ वातावरण कायम होते. येत्या 5 जूनला तळकोकणात मान्सूनचे आगमन होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 5 जूनला तळकोकणात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर दोन-तीन दिवसांत मान्सून राज्यात सर्वदूर पसरणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.