चिपळूण, रत्नागिरी मतदारसंघात राऊत यांची आघाडी
रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांचा दणदणीत विजय झाला आहे. महायुती कार्यकर्ते जल्लोष साजरा करीत असतानाच महायुतीतील उद्योगमंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम या दोघांच्या मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार श्री.विनायक राऊत यांना मताधिक्क्य मिळाले आहे, याचा नेमका अर्थ काय? याची चर्चा आता जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात सुरू आहे.
ना.सामंत, आ.निकम यांनी अहोरात्र कष्ट करून नारायण राणे यांच्यासाठी केलेले प्रयत्न कुठे कमी पडले? मतदारांनी ना.सामंत, आ.निकम यांचे ऐकले नाही का? ऐकले असेल तर विनायक राऊत यांना मताधिक्क्य कसे मिळाले? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे विधानसभेला ‘माझी बारी’ असा गर्भित इशारा नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. याचा फटका नक्की कोणाला बसणार? याची उलटसुलट चर्चा रत्नागिरी, चिपळूण दोन्ही मतदारसंघात सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांचा समावेश रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आहे. लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह काँग्रेसचे वर्चस्व आहे. तेथे विद्यमान आमदार राजन साळवी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी श्री.विनायक राऊत यांच्या विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्याचा प्रत्यय निकालात दिसून आला. या विधानसभा मतदारसंघात श्री.राऊत यांना 20,631 चे मताधिक्क्य मिळाले.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात गेले चार टर्म विद्यमान उद्योगमंत्री ना.उदय सामंत हे नेतृत्व करीत आहेत. मतदारसंघावर एकहाती पकड असलेले ना.उदय सामंत सध्या महायुतीत मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या समवेत आहेत. महायुतीतील जागा वाटपात शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ भाजपने आपल्या ताब्यात घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी दिली. ना.राणे विजयी झाले. परंतु रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांना 9,678 चे मताधिक्क्य मिळाले आहे. ना.सामंत यांची मतदारसंघावर एकहाती पकड असताना त्यांच्याच मतदारसंघात विरोधी पक्षाच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाली आहेत. ना.नारायण राणे यांना 72,497 तर विनायक राऊत यांना 82,175 मते मिळाली. त्यामुळे या मतदारसंघात श्री.राऊत वरचढ ठरले आहेत. त्यामुळे ना.सामंतांनी अहोरात्र केलेले प्रयत्न कुठे वाया गेले? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शेखर निकम यांनीही युतीधर्म पाळत ना.राणे यांचा प्रचार केला. त्यांच्या मदतीला शिवसेनेचे उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांची तगडी साथ होती. असे असतानाही या मतदारसंघात श्री.विनायक राऊत यांना तब्बल 79,619 तर ना.राणे यांना 59,992 मते मिळाली तर श्री.राऊत यांनी 19,627 चे मताधिक्क्य मिळवले. महायुती सरकारमध्ये एकत्र काम करणाऱ्या मंत्री, आमदारांच्या मतदारसंघात राणेंची पिछेहाट होण्यामागील काय कारणे हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आता ‘माझी बारी’ असा इशारा श्री.राणे यांनी विजयानंतर दिला होता, तो नेमका कोणाला होता? हे येत्या काही महिन्यातच स्पष्ट होणार आहे.