पालकमंत्री ना.उदय सामंत यांचा दावा
रत्नागिरी:- राज्यात शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी युती आहे. जिल्ह्यात भाजपाच्या पदाधिकार्यांच्या मी संपर्कात आहे, आम्ही देवेंद्रजींचे नेतृत्व मानतो. देवेंद्रजी भाजपासाठी महाराष्ट्रात जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक आहे. स्थानिक पदाधिकार्यांना जो निधी पाहीजे तो देण्याचा माझा प्रयत्न आहे. कमिट्यांवरही त्यांना घेतले आहे. पालकमंत्री म्हणून मी भाजपाला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रत्नागिरीत भाजपाच्या सर्व पदाधिकारी व नेत्यांच्या मी संपर्कात असून, त्यांच्याशी विकास कामांबाबतही चर्चा करीत आहे. रत्नागिरी सोडल्यास अगदी ठाण्यापासून अनेक पदाधिकारी संपर्कात आहेत. रत्नागिरीचे संपर्कमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशीही आपण चर्चा करीत असतो.
माजी आमदार व भाजपाचे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष बाळ माने यांचाही मतदार संघात मोठा आवाका आहे. एक चांगली संस्था ते चालवतात. काय समजगैरसमज असतात ते दूर होत असतात, असे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी बाळ मानेंबाबत बोलताना सांगितले.
१९९९पासून आपण या मतदार संघात कार्यरत आहोत. पहिल्या चार वर्षात २००४ पर्यत घेतलेली मेहनत आपण सर्वांनीच पाहिली आहे. त्यानंतर मी सातत्याने जिंकत आहे. आपला संपर्क नेहमीच तळागाळातील जनतेशी असतो, त्यामुळे कोण काय बोलत याकडे मी लक्ष देत नाही. मतदारांच्या मनात जे आहे तेच होणार आहे. ज्यांना कुणाला जे काय करायचे ते करावे, आपला विश्वास मतदारांवर आहे. आपण जनतेशी बांधिल असल्याचेही पालकमंत्री ना. सामंत यांनी स्पष्ट केले.
सर्वच पक्षांचे पदाधिकारी आपल्याला भेटत असतात, कुणी समोरुन भेटायला येते, कुणी पाठच्या दाराने भेटते, कुणी मंत्रालयात भेटायला येतात. पण आपण कुणाची नावे उघड करु इच्छीत नाही. कुणाला कामे झाल्यावर आपल्याला शिव्या द्यायच्या असतील तर त्यांनी खुशाल द्याव्यात असाही टोला त्यांनी विरोधकांना हाणला.