जिल्ह्यात बँक कर्मचाऱ्यांचा संप शंभर टक्के यशस्वी 

रत्नागिरी:-  पुरेशा प्रमाणात लिपिक, शिपाई, तसेच सफाई कर्मचारी यांची भरती करा. द्‌वीपक्ष बोलणी पुर्नस्थापित करा. मान्यताप्राप्त संघटनेबरोबर झालेल्या करारांची काटेकोर अंमलबजावणी करा व दविपक्ष बोलणी पुर्नस्थापित करा, उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी त्वरित चालू करा यासह इतर मागण्यांसाठी पुकारलेला आजचा बँक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचान्यांचा देशव्यापी संप रत्नागिरी जिल्ल्यामध्येही पूर्णतः यशस्वी झाला. 

आज बैंक ऑफ महाराष्ट्र मध्ये लिपिक, शिपाई तसेच सफाई कर्मचारी अत्यंत अपुऱ्या प्रमाणात आहेत सफाई कर्मचाऱ्यांचे पद बैंक ऑफ महाराष्ट्र मधून रद्द करण्यात आले आहे. आज 800 शाखांमधून शिपाई कर्मचारी नाही, 300 शाखांमधून लिपिकच नाही तर 1200 च्या आसपास शाखांमध्ये केवळ एकच लिपिक काम करत आहे. इतक्या अपुऱ्या व तुटपुंजा कर्मचारी असलेल्या शाखांमधून काम करत असते वेळी कामाचा ताण प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. कर्मचाऱ्यांना रजा घेता येत नाही त्यामुळे बँकेतील वाढलेला कामाचा ताण व खाजगी आयुष्य यामधील समतोल ढळत चाललेला आहे. ग्राहक सेवेवर अनिष्ट परिणाम होत आहे. नित्यनेमाची काम आऊटसोर्सिंग द्वारे निभावली जात आहेत त्यामुळे बँकेच्या प्रोसिजरमध्ये तडजोड करावी लागते. त्यामधून ऑपरेशनल रिस्क तसेच ऑपरेशनल फ्रॉड वाढण्याचा धोका संभवतो. आणि या सर्वाचा बँकेच्या एकूणच परफॉर्मन्सवर अनिष्ट परिणाम होतो. म्हणून पुरेशा प्रमाणात सर्व स्तरांवरील नोकर भरती केलीच पाहिजे ही प्रमुख मागणी या संपामध्ये करण्यात आली आहे.

      त्याचबरोबर संघटनेबरोबर झालेल्या करारानुसार स्पेशल असिस्टंट च्या जागा बँक गेली दहा वर्षे भरतच नाहीये त्या त्वरित भरल्या पाहिजेत. बँकेमध्ये 40 वर्षाहून जास्त काळ असलेली मान्यता प्राप्त संघटनेची कार्यालये बँकेने जबरदस्तीने ताब्यात घेतली आहेत. ती संघटनांना परत केली पाहिजेत. संघटनेच्या प्रतिनिधित्वा बाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सहा महिन्यांहून अधिक काळ झाला तरी देखील बँक सुरू करत नाहीये. आज बैंक न्यायालयाचे निर्णय, लेबर कोर्टाचे निर्णय, शासकीय यंत्रणांचे आदेश मानायला तयार नाही. संघटना व बँकेमध्ये तडजोड करण्यासाठी लेबर कमिशनर सोबत झालेल्या तीन चर्चेच्या फेरीमध्ये बँकेने आडमुठी भूमिका घेतली कोणतीही लवचिकता दाखवली नाही सबब आजचा हा देशव्यापी संप अटळ बनला.

        या संपामुळे ग्राहकांची गैरसोय होणार आहे याची जाणीव संघटनांना आहे व त्याब‌द्दल त्यांनी ग्राहकांशी दिलगिरीही व्यक्त केली आहे. आपल्या न्याय व रास्त मागण्या उच्च व्यवस्थापनापर्यंत पोहोचण्यासाठी आज महा बँकेच्या विविध कार्यालयांसमोर देशभर निदर्शने करण्यात आली. रत्नागिरी मध्येही आरोग्य मंदिर येथील झोनल ऑफिस समोर महा बँकेतील कर्मचाऱ्यांनी उग्र निदर्शने केली. या संपाचे व निदर्शनांचे नेतृत्व राजेंद्र गडवी व भाग्येश खरे या संघटना प्रतिनिधीने केले.