जिल्ह्यात पोलीस भरतीच्या एका जागेसाठी ५१ अर्ज

जागा १७०, उमेदवारी अर्ज ८७१३

रत्नागिरी:- पोलीस भरती प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील १७० जागांकरीता ८ हजार ७१३ अर्ज प्राप्त झाले आहेत. भरतीच्या जागा आणि प्राप्त अर्ज यांचे प्रमाण ५१ पट असल्याने उत्सुक लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदासाठी १४९ पदे भरायची आहेत. यामध्ये अनुसूचित जातीची २१, अनुसूचित जमातीची १०, विमुक्त जाती अ करीता १२, भटक्या जमाती ब साठी ४, भटक्या जमाती क साठी ५, भटक्या जमाती ड साठी २, विशेष मागास प्रवर्गासाठी २, इतर मागासवर्गीयांसाठी ४, एसईबीसीसाठी १५ इडब्ल्यूएससाठी १५, खुली पदे ५९ अशा विगतवारीचा समावेश आहे.

शिपाई पदाच्या १४९ पदापैकी महिला ४७, सर्वसाधारण ४३, खेळाडू ८, प्रकल्पग्रस्त ८, भूकंपग्रस्त १, माजी सैनिक २३, अंशकालीन पदवीधर ८, पोलीस पाल्य ३, गृहरक्षक दल ८, अनाथ १, बॅडस्मन ५ यांचा समावेश आहे. पोलीस शिपाई चालक पदासाठी २१ पदे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी अनुसुचित जाती २, अनुसुचित जमाती २, विमुक्त जाती अ १, भटक्या जमाती ब १, इतर मागासवर्ग ४, एसईबीसी. २, ईडब्ल्यूएस २, खुला प्रवर्ग ७ अशा पदांचा समावेश आहे. कप्पीकृत आरक्षणामध्ये चालक पदासाठी सर्वसाधारण गटात १२, महिलांसाठी ७, माजी सैनिकांसाठी २, अनाथांसाठी रिक्त पदांच्या १ टक्का एवढी पदे राखीव ठेवण्यात येणार आहेत.

पोलीस शिपाई पदासाठी १४९ पदे व पोलीस शिपाई चालक पदासाठी २१ पदे मिळून १७० पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी आतापर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज पोहोचण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ८७१३ अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. यापैकी पोलीस शिपाई पदासाठी ६८३८, पोलीस शिपाई चालक पदासाठी १२३९ आणि बॅड्समन पदांसाठी ६३६ अर्ज प्राप्त झाले आहेत. भरती १७० पदांची असताना ८७१३ अर्ज प्राप्त झाले आहेत. एका रिक्त पदासाठी जवळपास ५१ अर्ज सादर झाले आहेत. यामानाने बेकारीचे अनुमान काढण्यात येत आहे.