रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 141 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दोन दिवसात पॉझिटिव्ह रुग्णसंख्येने साडेतीनशेचा टप्पा गाठला आहे. मागील चोवीस तासात उपचाराखाली असलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 156 झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी जिल्ह्यात सर्वाधिक 201 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. तर गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी 141 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसात जवळपास साडेतीनशे पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
गुरुवारी प्राप्त अहवालांमध्ये 141 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 हजार 409 इतकी झाली आहे. तर 81 जणांचे अहवाल निगेटिव्ह म्हणून प्राप्त झाले आहेत. आता पर्यंत 26 हजार 265 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 73 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आता पर्यंत 3 हजार 333 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान गुरुवारी जिल्ह्यात उपचाराखाली असलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 156 वर पोचली आहे. तीन जणांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात कोरोनाचा मृत्युदर 2.88 टक्क्यांवर पोचला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 1 हजार 51 रुग्ण उपचारा खाली आहेत.