जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा मारा 

रत्नागिरी:- अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. असे असतानाच काल पहाटेपासूनच रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

वातावरण बदलाचे परिणाम वारंवार दिसून येत आहेत. गेल्या दशकभरात नोव्हेंबर महिन्यातील पावसाचं प्रमाण दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सांताक्रझ येथील पर्जन्यमापकामध्ये २४.७ मिमी पावसाची नोंद नोव्हेंबर महिन्यात झाली आहेत. अधिकाऱ्यांनी अवकाळी पाऊस पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानं पुढील काही दिवसांसाठी ‘यलो अ‌लर्ट’ जारी केला आहे.

मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, त्याप्रमाणे जिल्ह्यात काल पहाटेपासून पावासाला सुरुवात झाली. चक्राकार वार्‍याच्या प्रभावाने कोकण किनारपट्टी भागातील रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. काल हलक्या पावसाने सकाळपासून सातत्य राखले असताना पावसाच्या जोरदार शक्यतेने रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील अन्य जिल्ह्यात ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पर्यायाने कोकण किनारपट्टीवर प्रभाव राहणार आहे. त्यामुळे रत्नागिरीसह पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काल पहाटेपासूनच हलक्या पावसाचे सातत्य होते.अवकाळी पावसाने संकटात सापडलेल्या आंबा बागायतदारांच्या अडचणी त्यामुळे वाढल्या आहेत. काल सकाळपासूनच सातत्य राहिलेल्या हलक्या पावसाने वातावरणात गारवा येऊन तापमानातही कमालीचा बदल झाला. एरव्ही 30 अंश सेल्सिअस असणारे तापमान सकाळी 26 अंश सेल्सिअस होते.दुपारी मात्र थोडी वाढ होऊन 28 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले. रत्नागिरी जिल्ह्यासह अन्य किनारी जिल्ह्यात ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी करताना सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.