जिल्ह्यात पावसाच्या दमदार सरी

रत्नागिरी:- हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. चिपळूण, संगमेश्‍वरसह रत्नागिरी तालुक्यात मुसळधार सरी पडल्या असून उर्वरित सर्व तालुक्यात हलका पाऊस झाला. त्यामुळे बळीराजला दिलासा मिळला आहे. मजगाव येथे घरावर झाड पडून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवान घरातील कुणालाही दुखापत झाली नाही.

शनिवारी (ता. १०) सकाळी ८.३० वाजेपर्यंत च्या चोवीस  तासात जिल्ह्यात सरासरी १८ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड १, दापोली २७, खेड २६, गुहागर ५, चिपळूण ३९, संगमेश्वर ९, रत्नागिरी १७, लांजा ३०, राजापूर ८ मिमी पाऊस झाला. गेले दोन दिवस चिपळूण, संगमेश्‍वरसह रत्नागिरी, लांजा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. शुक्रवारी दुपारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारनंतर पावसाने जोर धरला. संगमेश्वर, चिपळूणला चांगलेच झोडपून काढले. रात्री पावसाचा जोर कमी झाला. मात्र शनिवारी दुपारपासून पुन्हा संततधार सुरु होती. विजांच्या कडकडाटासह पडत असल्यामुळे पावसामुळे विजेचा खेळखंडोबा सुरु होता. काल रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मजगाव येथे इरफान मुकादम फिरोज मुकादम यांच्या घरावर हापूसचे कलम पडले. मुकादक कुटूंबिय अर्ध्या झोपेत होते. मोठा आवाज झाल्यानंतर घरातील सगळी लोकं बाहेर धावली. भलेमोठे झाड घरावर कोसळलेले होते. सुदैवाने यामध्ये कुणालाच दुखापत झाली नाही. आतमध्ये मुकादम कुटूंबातील सहा जणं होते. यामध्ये घराची एकबाजू पूर्णतः कोसळली असुन एक लाखापर्यंत नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हा प्रकार समजल्यानंतर मजगांवचे सरपंच फय्याज मुकादम यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तातडीने विज कर्मचार्‍यांना बोलावून विज पुरवठा खंडित करण्यात आला होता. मागील आठवड्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे भातशेती करपण्याची भिती होती. दिवसा पडणार्‍या कडकडीत उन्हामुळे शेतकर्‍यांची पंचाईत झाली होती. कातळावरील शेतीला सर्वाधिक फटका बसला असता; परंतु पावसाने जोर धरल्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.