रत्नागिरी:- पावसाचा जोर वाढल्यामुळे खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पाणी मच्छीमार्केट परीसरात आले आहे. चिपळूण मिरजोळी येथे नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने जुवाड भागातील 13 कुटुंबातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. वेगवान वार्यांमुळे झाडे घरावर पडून, संरक्षक भिंत कोसळून घरांचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान नोंद गेले आहे.
जिल्ह्यात बुधवारी (ता. 13) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात 61.78 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला आहे. त्यात मंडणगड 70, दापोली 30, खेड 81, गुहागर 14, चिपळूण 97, संगमेश्वर 45, रत्नागिरी 37, लांजा 120, राजापूर 62 मिमी पाऊस झाला. खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खेड शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका आहे. सुरक्षिततेसाठी एनडीआरएफची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. राजापूर तालुक्यातील कोदवली नदीही इशारा पातळीवरून वाहत आहे. अजुनही पुर आलेला नाही. पाऊस आणि वेगवान वार्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. त्यात करंजारी (ता. दापोली) येथे स्वप्नील सिताराम जाखड यांच्या घराचे 96 हजार 400 रूपयांचे, खारी येथील अनिल गंगाराम मोहितेंच्या घराचे 3600 रुपये, खेड तालुक्यात कसबा नातू, आसान येथील दोन घरांचे, अनसरेतील एका, हिलम व धामनर येथील प्रत्येकी एक तर धामणंद ग्रामपंचायत इमारतीचे मिळून दोन लाख रूपयांचे नुकसान झाले. चिपळूणात पाच घरांची एक लाख रुपये, संगमेश्वर तालुक्यातील एक लाख रुपये तर लांजा तालुक्यात एका घराचे झाड पडून नुकसान झाले. रत्नागिरीत खेडशी रोड आकाशवाणी केंद्राजवळ झाड पडले होते. ते तात्काळ बांधकाम विभागाकडून काढून टाकण्यात आल्यामुळे वाहतुक सुरळीत झाली. दापोली दाभोळ येथे घरावर माडाचे झाड पडून 28 हजार 50 चे, अगरवायंगणी येथे घराचे 25 हजार रुपयांचे रत्नागिरी तालुक्यातील उक्षी येथील घराचा चौथरा खचला असून भिंतीना तडे गेले आहेत. कुटुंबातील 5 सदस्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पेंडखळे येथील अतिवृष्टी व वादळामुळे घराचे पत्रे उडून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले.