जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; पूरस्थिती नियंत्रणात

रत्नागिरी:- राजापूर, खेड वगळता अन्य तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कमी होऊ लागला आहे. जगबुडी, अर्जुना नदीचे पाणी अजूनही काही ठिकाणी साचून राहिले आहे. पाऊस कमी झाल्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पुर्वपदावर येत आहे; मात्र दोन दिवस किनारपट्टी भागात वेगवान वारे घोगावत आहे. समाधानकारक पावसामुळे भात लावणीच्या कामांना वेग आला आहे.

बुधवारी (ता. ६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी १५८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. लांजा तालुक्यात गेल्या दोन दिवसांमध्ये सर्वाधिक पावसांची नोंद झाली आहे. तुलनेत रत्नागिरी तालुक्यात शंभर मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे. रत्नागिरीतील काजळी नदीला आलेल्या पुराचे पाणी ओसरले आहे. जोर कमी झाला असला तरीही दरडी कोसळणे, झाडे पडून घरांचे नुकसान होणे यासारखे प्रकार सुरुच आहेत. राजापूरात दिवसभर संततधार पाऊस पडत होता. अर्जुना, कोदवली नद्यांच्या पुराचे पाणी बुधवारी दुपारपर्यंत ठिकठिकाणी साचून होते. मात्र घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नद्यांचे पाणी कमी होऊ लागले आहे. जवाहर चौकातील पाणी सायंकाळी ओसरल्याने व्यावसायीकांनी निःश्‍वास सोडला. जगबुडीचा पूर ओसरु लागला असला तरीही मच्छीमार्केट, देवळे बंदर या परिसरात अजूनही पाणी साचून होते. पावसाचा जोर वाढला तर पुन्हा पुरस्थिती निर्माण होण्याची भिती होती. खेड तालुक्यातील शिवरत रोड येथे घरावर झाड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवान घरातील लोकांना दुखापत झालेली नाही. दापोली तालुक्यातील इकबालनगर येथे एका घराची संरक्षक भिंत कोसळल्याने आजूबाजूच्या पाच घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यातील २९ लोकांचे स्थलांतर करण्यात आले. संगमेश्‍वर तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे येथे एका घराचे १ लाख ३१ हजार रुपयांचे नुकसान झाले. चिपळूणमध्ये वेरळ-खोपी येथे मोहल्ल्यामध्ये झाड कोसळून एक तास वाहतूक बंद होती. तर खेर्डी-टेरव येथे कामथे दरम्यान दरड कोसळल्याने वाहतूकीत अडथळा निर्माण झाला. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाट अजुनही बंदच ठेवण्यात आला आहे.

सर्वाधिक पाऊस दापोलीत

सलग दोन दिडशे मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. मंडणगड १९५, दापोली २२४, खेड १०९, गुहागर १५३, चिपळूण १६५, संगमेश्वर १४४, रत्नागिरी ९३, राजापूर १४९, लांजा १९१ मिमी पाऊस झाला.