जिल्ह्यात परतीच्या पावसाचा प्रवास सुरू; मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

रत्नागिरी:- पावसाने परतीचा मार्ग स्विकारला असून शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार सर कोसळली. अचानक सुरु झालेल्या पावसाने सायंकाळी कार्यालयीन कामकाज आटपून परतणार्‍यांची तारांबळ उडाली होती. तसेच राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, लांजा तालुक्यातही हलका पाऊस झाला आहे. जिल्ह्यात शनिवारपर्यंत हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाकडुन वर्तवली आहे.

राज्यात परतीचा पाऊस सुरु झाला आहे. मागील आठवड्यात दिवसभर कडकडीत उन आणि सायंकाळी हलकी एखादी पावसाची सर असे वातावरण आहे. काही तालुक्यात तर निरंक नोंद आहे. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी ३.६७ मिमी पाऊस झाला. त्यात दापोली १, खेड ५, संगमेश्‍वर २३, राजापूर ४ मिमी नोंद झाली. १ जुनपासून आजपर्यंत ३,४५३ मिमी सरासरी पाऊस झाला. तर गतवर्षी याच कालावधीत ४ हजार २०८ मिमी पाऊस झाला होता. तुलनेत ८०० मिमी कमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी दिवसभर कडकडीत उन पडलेले होते. मात्र सायकाळी अचानक ढगाळ वातावरण झाले आणि पावसाला सुरवात झाली. विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढत गेला. सुमारे एक तास पावसाचा जोर सुरुच होता. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कार्यालयीन कामकाज पूर्ण करुन अनेक कर्मचारी घरी परतत होते. त्यांना पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी टपरी, दुकानाच्या पायर्‍या यासह मिळेल त्या ठिकाणी थांबावे लागले. काही दुचाकी चालक पावसात भिजत होते. शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी वाहू लागले होते. दिवसभर उष्म्याने त्रस्त रत्नागिरीकरांना गारव्याचा दिलासा मिळाला. जिल्ह्यात तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस होते.

दरम्यान, राजापूर, संगमेश्वर तालूक्यात दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. तर चिपळूणात सायंकाळी जोरदार पाऊस झाला. लांजा तालुक्यात सायंकाळी हलका पाऊस पडला. विजांच्या कडकडाटा सायंकाळी सुरू होता. जिल्ह्यात शनिवारपर्यंत हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाकडुन वर्तवली आहे. प्रशांत महासागरातील वादळाच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याच्या प्रभावाने कोकण किनारपट्टी भागात आगामी दोन दिवस मळभी वातावरण तयार होणार असून यामुळे काही भागात हलका पाऊस शक्य आहे.