रत्नागिरी:- फेब्रुवारी, मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात उन्हाचा परिणाम जाणवत आहे. तीन तालुक्यांतील 9 गावातील 10 वाड्यांमधील 974 लोकांना पाणी टंचाईची झळ बसली आहे. चार टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाच्या झळा जाणवण्यास सुरुवात होते. यंदा उन्हाची तीव्रता फेब्रुवारी महिन्यातच जाणवू लागली. परिणामी भूजल पातळी कमी झाली. विहिरींचे पाणी कमी झाल्यामुळे मे महिन्यात टंचाईची तीव्रता वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदा मार्च महिन्यात जिल्ह्यातील पहिला टँकर खेड तालुक्यात धावला. टँकरने पाणी पुरवठा करणार्या गावांच्या संख्येत प्रत्येक आठवड्याला वाढ होत आहे. गतवर्षीप्रमाणेच टँकरग्रस्त गावांची संख्या तेवढीच असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. या आठवड्यापर्यंत 9 गावातील 10 वाड्यांमध्ये चार टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत 38 फेर्या झाल्या असून 974 लोकांनी याचा लाभ घेतला आहे. तीन तालुक्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असला, तरीही सहा तालुक्यांमध्ये टँकर धावलेला नाही. खेड तालुक्यात 3 गावांमध्ये व 4 वाड्यांमध्ये 411 लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा होत आहे. चिपळूण तालुक्यात 5 गावांतील 5 वाड्यांतील 413 लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा होत आहे. लांजा तालुक्यात 1 गावातील 1 वाडीसाठी 150 लोकांना पाणीपुरवठा होत आहे.