बाधितांमध्ये घट; जुलैमध्ये पंधरवड्यात साडेसहा हजार बाधित
रत्नागिरी:- मार्च महिन्यात सुरु झालेला दुसर्या लाटेचा प्रभाव जिल्ह्यात ओसरु लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एप्रिल, मे, जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. जुलै महिन्यात अठरा दिवसात 6 हजार 495 बाधितांची नोंद झाली आहे. जून महिन्यात हाच आकडा दहा हजाराच्या घरात होता.
गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला. त्यानंतर वर्षभरात दुसर्या लाटेने देशभरात हाहाकार माजवण्यास सुरवात केली. महाराष्ट्रात मुंबईसारख्या जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यश आले; मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे त्याला अपवाद ठरले. अजुनही राज्याच्यातील दहा चिंताजनक परिस्थिती असलेल्या जिल्ह्यामध्ये रत्नागिरीचा क्रमांक चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर पावणेसहा टक्केच्या दरम्यान आहे. आजारी, मधुमेही तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांमध्ये कोरोनाची लागण सर्वाधिक होती. दुसर्या लाटेमध्ये सर्वाधिक तरुण बाधित झाले असून त्यात मृत्यूचा आकडाही अधिक आहे.
तसेच एकुण बाधितांच्या तुलनेत सहा टक्के 14 वर्षांखालील मुले कोरोनामुळे बाधित झाली. सुदैवाने त्यात एकही बालक मृत पावलेले नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 29 हजार 166 जणांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यातील 68 हजार 323 जणांना कोरोनाची लागण झाली असून 4 लाख 60 हजार 843 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. बाधितांमधील 62 हजार 702 जणं बरे होऊन घरी परतले आहेत. बरे होण्याचा दर 92 टक्केपर्यंत पोचला आहे. जिल्हा प्रशासनाकडून मागील पंधरा दिवसात दररोज सात हजार चाचण्यांचे लक्ष निश्चित करुन ग्रामीण भागात अधिक बाधित सापडलेल्या गावांवर लक्ष केंद्रीत केले. गावे, वाड्या कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करुन निबर्ंध घातले. त्या गावांमध्ये सरसकट चाचण्या करण्यास सुरवात केली. जुनच्या मध्यात सुरु केलेल्या या प्रयोगाचा परीणाम जुलैच्या मध्यात दिसू लागला आहे. मे, जुन महिन्यात दिवसाला पाचशे बाधित सापडत होते. जुलै महिन्यात ते तीनशे-साडेतीनशेच्या दरम्यान आले आहेत. मागील पंधरवड्यात साडेसहा हजार बाधित सापडले आहेत. मागील तिन महिन्यांच्या तुलनेत हा आकडा खुपच कमी आहे. यावरुन जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आलेख कमी होत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
दरम्यान नुतन जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी दिवसाला दहा हजार चाचण्यांसह बारा तासात कोरोना बाधितांचा आरटीपीसीआर अहवालांवर भर देण्याचा निर्णय दोन दिवसांपुर्वी घेतला आहे. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटीव्ही दर एक टक्क्यापर्यंत येईल.