रत्नागिरी:- ‘गणपती बाप्पा मोरया…पुढल्या वर्षी लवकर या..’च्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात शनिवारी जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन अत्यंत भक्तीभावात झाले. पावसाच्या साथीने जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणरायांनी निरोप घेतला. पुढच्यावर्षी लवकर येण्याची साद घालत गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. शनिवारी जिल्ह्यात १० हजार ८८ बाप्पांना वाजत गाजत भावपूर्ण निरोप देण्यात आला.
जिल्ह्यात सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची धुम आहे. भक्तांच्या अनेक दिवसाची प्रतिक्षा सोमवारी संपुष्टात आली. शुक्रवारी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात दीड लाखापेक्षा अधिक बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. भक्तांच्या घरी दीड दिवसांचा पाहूणचार घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्हयात दीड दिवसांच्या जवळपास दहा हजारपेक्षा अधिक घरगुती आणि दोन सार्वजनिक गणेशांचे विसर्जन भक्तीमय वातावरणात झाले. श्री गणेश विसर्जनासाठी रत्नागिरीतील मांडवी समुद्र किनारी गणेशभक्तांनी विसर्जनासाठी मोठी गर्दी केली अनेकांनी खासगी वाहनांमधून आपल्या लाडक्या गणरायाला नेत गणेश भक्तांनी विसर्जन केले. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देताना पावसाने देखील हजेरी लावली होती. दीड दिवसाच्या गणरायाला शांतपणे निरोप देण्याची परंपरा आहे. पारंपारीक पध्दतीने शनिवारी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. विसर्जनासाठी मांडवी किनारी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
शनिवारी जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. त्यामध्ये रत्नागिरी शहर- ६३५, ग्रामीण-११४, जयगड-३८१, संगमेश्वर-७४१, संगमेश्वर-२ हजार ४७५, नाटे-२६५, लांजा-१२५, देवरूख-२६५, सावर्डे-१४०, चिपळूण-१०९, गुहागर-८२५, अलोरे-२००, खेड-९५२, दापोली-१ हजार ३००, मंडणगड-९२०, बाणकोट-२१५, पुर्णगड-१३६, दाभोळ-३९० गणरायांचे मगळवारी विसर्जन करण्यात आले.