जिल्ह्यात दिवाळीचा २० टक्के ‘शिधा’ अद्यापही पडून

८० टक्के वाटप पूर्ण : आठ दिवसात न उचलल्यास वाटप बंद

रत्नागिरी:- सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य शासनाने आनंदाचा शिधा जाहीर केला. जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांवर सहा वस्तूंचा हा संच १०० टक्के पोहचला. आतापर्यंत १ लाख ९७ हजार ९७६ लाभार्थ्यांनी संच उचलला आहे. ८० टक्के हे वाटप झाले असले तरी अजूनही २० टक्के लाभार्थ्यांनी दिवाळी संपली तरी आनंदाचा शिधा उचललेला नाही. आठ दिवसात उर्वरितांनी शिधा न उचलल्यास वाटप बंद केले जाणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्य शासनाने यावर्षीही तरी दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत पोहचावा यासाठी चांगले नियोजन केले होते. त्यामुळे गेल्या महिन्यात २५ तारखेपासूनच वाटपाचा आरंभ केला; परंतु अनेक ठिकाणी हा मुहूर्त हुकला; पण या वेळी जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांवर आनंदाचा शिधा संच १०० टक्के उपलब्ध झाला होता. त्याचे वाटप ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यासाठी नागपूर आणि पुण्यातील दोन पुरवठादार नियुक्त करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात याचे २ लाख ५३ हजार लाभार्थी आहेत. सर्व रेशनदुकानावर आनंदाचा शिधा संच पोहचला. लाभार्थ्यांना याबाबत आवाहनही करण्यात आले; परंतु दिवाळी संपली तरी आतापर्यंत १ लाख ९७ हजार ९७६ लाभार्थ्यांनी संच उचलला आहे. हे ८० टक्के वाटप झाले आहे; मात्र या वेळी शिधा उपलब्ध असूनही २० टक्के अद्याप उचललेला नाही. ३० नोव्हेंबरपर्यंत शिधा उचलण्याची मुदत आहे. त्यानंतर याचे वाटप थांबणार आहे. शिधा न उचलण्याचे कारण मात्र कोणाकडे नाही.