रत्नागिरी:- हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्या नुसार गुरुवारी दिवसभर पावसाने जिल्हाभरात पावसाने विनाउसंत हजेरी लावली. सायंकाळ नंतर पावसाचा जोर आणखी वाढला होता. दिवसभर धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर पुढील तीन दिवस कायम राहील असा इशारा हवामान विभागाच्यावतीने देण्यात आला आहे.
जिल्ह्यात संततधार पाऊस पडत असून जगबुडी, काजळी, वाशिष्टी नद्या भरून वाहू लागल्या आहेत. या पावसामुळे भात रोपाची वाढ व्यवस्थित होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 47.44 मिमी तर एकूण 427 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 36 मिमी , दापोली 26 मिमी, खेड 22 मिमी, गुहागर 34 मिमी, चिपळूण 36 मिमी, संगमेश्वर 49 मिमी, रत्नागिरी 31 मिमी, राजापूर 143 मिमी व लांजामध्ये 50 मिमी. इतका पाऊस पडला आहे.
पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसानीच्या नोंदी झाल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यात सैतवडे गावामधील वैभव वझे यांच्या घरासमोरील विहीरीवरती लगत असणाऱ्या पायवाटेवरुन पाण्याचा प्रवाह जास्त आल्याने मोठा दगड घसरुन व विहीरीलगत असणारे नारळाचे झाड पडल्यामुळे विहीरीचे अंदाजे 30 ते 35 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच मौजे विल्ये गाव येथील शांताराम विलकर यांच्या घराजवळची भिंत कोसळून अंदाजे 56 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.