रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी कोकणात येणार्यांची पावले वळू लागली आहेत. त्यामुळे एसटी, रेल्वेसह खासगी वाहनांचा आधार घेत चाकरमानी गावात दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तपासणीसह मदत पथके कार्यरत ठेवली असून आतापर्यंतच्या तपासणीत दहा कोरोना बाधित सापडले आहेत.
कोरोनामुळे अनेक चाकरमान्यांनी गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी आठ दिवस आधीच गावाकडे येणे पसंत केले होते. उर्वरितांनी गणपती प्रतिष्ठापनेच्या दिवशी आणि आधी दोन दिवसांच्या एसटी, रेल्वे गाड्यांचे आरक्षण केले होते. काही चाकरमानी खासगी गाड्यांमधून येत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वर्दळ सुरु होती. चौपदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे वाहतुक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. पाऊस आणि महामार्गाची कामे यामुळे रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमधून प्रवास करण्याची वेळ चाकरमान्यांवर आली. जिल्हा प्रशासनाकडून चाकरमान्यांच्या सुकर प्रवासासाठी ठिकठिकाणी मदत केंद्र सुरु केली होती. तसेच गावाकडे परतलेल्या लोकांच्या तपासणीची जबाबदारी ग्राम कृती दलाकडे सोपवण्यात आली आहे. त्यानुसार काही अंशी कार्यवाही सुरु झाली आहे.
कोरोना असुनही चाकरमान्यांची सर्वाधिक पसंती कोकण रेल्वेलाच आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकांत प्रवेश करताना आणि बाहेर पडताना प्रवाशांचे औष्णिक तापमान तपासले जात आहे. राज्य आरोग्य प्राधिकरणाच्या समन्वयाने प्रमुख स्थानकांवर प्रथमोपचार वैद्यकीय सुविधा उभारल्या आहेत. कोकण रेल्वेतील अनधिकृत प्रवाशांना आळा घालण्यासाठी स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी केली जात आहे. अतिरिक्त सुरक्षेसाठी गर्दी नियंत्रण आणि कायदा सुव्यवस्था व सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी आरपीएफ कर्मचार्यांसह अतिरिक्त रेल्वे सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. कोकण रेल्वे मार्गावर 224 फेर्या सोडण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहीतीनुसार जिल्ह्यात आलेल्या 9 हजार 230
चाकरमान्यांच्या चाचण्या झाल्या. त्यात फक्त् बुधवारी 1 हजार 831 जणांच्या चाचण्या झाल्या. एकुण चाचण्यांमध्ये दहा जणांचे अहवाल बाधित आले असून गुहागरमधील तिन तर रत्नागिरीतील सात जणांचा समावेश आहे. गुुरुवारी (ता. 9) दिवसभरात एसटी, रेल्वेला प्रचंड प्रमाणात गर्दी होती. तसेच गणेश आगमनाच्या दिवशीही अनेक प्रवासी गावात दाखल होणार आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचा आकडा लाखावर जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.