किरण सामंत; रस्ते, साकव, पुलासाठी ४०० कोटींचा प्रस्ताव
रत्नागिरी:- मुंबई शहरानंतर रेल्वे, विमान, जल आणि रस्ते अशा चारही वाहतुकीच्या सुविधा असणारे रत्नागिरी हे कोकण किनारपट्टीवरील एकमेव शहर आहे. त्यामुळे टेस्लासारखा आंतरराष्ट्रीय प्रकल्प आल्यास जिल्ह्याचा कायापालट होईल आणि जिल्हा ऑटोमोबाईल हब होण्याच्यादृष्टीने वाटचाल करेल, असा विश्वास राजापूर-लांजाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी दौऱ्यावर पत्रकारांशी चर्चेवेळी ते म्हणाले, राजापूर-लांजा विधानसभा मतदार संघाचा विकासात्मक रोडमॅप तयार केला आहे. पाणी, शिक्षण, आरोग्य या प्रमुख समस्या असून, रोजगार निर्मितीवरही भर देणार आहे. या संघात पाण्याचा मोठा प्रश्न ग्रामस्थांनी निवडणुकीदरम्यान कानावर घातला होता. पुढील दोन-तीन वर्षात येथील पाणीप्रश्न सोडवण्यावर माझा भर राहणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्ययंत्रणा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्यकेंद्र अद्ययावत करण्यावर लक्ष आहे. ओणी येथील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल लवकर सुरू व्हावे म्हणून प्रयत्न सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मतदार संघासाठी आवश्यक निधीची मागणी करण्यात आली आहे. सुमारे एक हजार कोटींहून अधिकचा निधी लागणार आहे. राजापूर मतदार संघ एक मॉडेल बनावा यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मतदार संघातील रस्ते, साकव, पूल व अन्य कामांसाठी सुमारे चारशे कोटीहून अधिकचा प्रस्ताव दिलेला आहे.