जिल्ह्यात जी आय मानांकन वापरकर्ते वाढवणे काळाची गरज

विभागस्तरीय उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलन संपन्न

रत्नागिरी:- कोकणातील सहा पिकांना जी आय मानांकन प्राप्त झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जी आय चे वापरकर्ते वाढविले पाहिजेत. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्मार्ट योजनेचा, प्रधानमंत्री फळ प्रक्रिया योजना, सेंद्रिय शेती योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे. या योजनांमधून शासनाच्यावतीने चांगले अनुदान मिळते. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावे, असे आवाहन कोकण विभागाचे स्मार्ट प्रकल्पाचे विभागीय अंमलबजावणी कक्षाचे प्रमुख अंकुश माने यांनी रत्नागिरीत केले.

रत्नागिरीत कृषी विभागामार्फत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट अंतर्गत विभागस्तरीय उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमावेळी कोकण विभागाचे नोडल अधिकारी भिमाशंकर पाटील, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी, आत्माचे प्रकल्प संचालक जालिंदर पांगरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक मंगेश कुलकर्णी, जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुऱ्हाडे आदिनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी कोकणातील कृषी आधारित कंपन्यांच्या प्रतिनिधींना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी कोकण कृषी विद्यापिठाचे संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, पणनचे उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी, नोडल अधिकारी भिमाशंकर पाटील, जिल्हा कृषी अधिक्षक सुनंदा कुर्‍हाडे, जिल्हा विकास अधिकारी अजय शेंडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी माने म्हणाले, शेतकर्‍यांना आर्थिक स्थिरता मिळवून देण्यासाठी कार्यशाळेचा उपयोग शेतकर्‍यांना होणार आहे. जागतिक बँकेच्या साह्याने स्मार्ट, नैसर्गिक शेती अभियान राबवण्यात येत आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांमधून शेतकर्‍यांना अनुदान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. नैसर्गिक शेती अभियानांतर्गत योजनेसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामधून कोकणातील 55 कृषी कंपन्यांना 66 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामध्ये भागभांडवलासह अन्य सर्व बाबींचा समावेश आहे. कोकणात आंबा, काजू, भाताची लागवड मोठ्याप्रमाणात केली जाते. ही उत्पादने सेंद्रीय पध्दतीने करण्यावर शेतकर्‍यांनी भर दिला पाहीजे. तसेच ्रप्रक्रिया केलेल्या पदार्थांना बाजारात अधिक मागणी आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी सेंद्रीय प्रमाणीकरण करुन घेतले पाहीजे. कोकणातील शेतकर्‍यांनी फायदा उचलला पाहीजे.
निर्यातक्षत आंबा व काजू या विषयावर मार्गदर्शन करताना अधिकार्‍यांकडून सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार जागतिक पातळीवर भारत 41 टक्के आंब्याची विविध देशांमध्ये निर्यात करतो. कोकणात हापूसचे क्षेत्र 1 लाख 82 हजार हेक्टर आहे. उत्पादकता हेक्टरी 2.50 ते 3 टन इतकीच आहे. हापूसची उत्पादकता अन्य आंब्याच्या तुलनेत कमी आहे. वर्षा आड येणारे फळ आणि त्यामध्ये निर्माण करणारा सामा ही कारणे आहेत. 2001 साली निर्यात 68 कोटी इतकी होती, ती आता 400 कोटीवर पोचली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आखाती देशातील निर्यात कमी झाली आहे. तुलनेत थायलंड, रशिया या देशांमध्ये आंबा निर्यात सुरु झाली आहे. निर्यातवाढीसाठी शासनाकडून नियोजन केले जात असल्याचे कार्यशाळेत सांगण्यात आले.