जिल्ह्यात जिल्हा परिषद गट 7 ने तर पंचायत समितीचे गण 14 ने वाढणार

रत्नागिरी:-जिल्ह्यात जिल्हा परिषद गटात 7 ने तर पंचायत समिती गणा 14 ने वाढ होणार असून जिल्ह्यात 62 गट तर 124 पंचायत समिती गण होणार आहेत. जिल्हास्तरावरुन राज्य निवडणूक आयोगाला या बाबत प्रपत्र सादर करण्यात आले असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार त्यावरील हरकती आणि पुढील कार्यवाहीची प्रक्रिया होणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे पडघम जिल्ह्यात वाजू लागले आहेत. नवीन गट व गण रचनेबाबत प्रत्येक तालुक्यातील सर्व पक्षिय कार्यकर्त्यांमध्ये औत्सुक्य निर्माण झाले आहे.
निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील गट आणि गणांची नव्याने रचना करण्यात आली आहे. नवीन निकषानुसार गटांची लोकसंख्या निश्चित करण्यात आल्यामुळे जिल्हा परिषद गटांची संख्या सातने तर गणांची संख्या चौदाने वाढली आहे.
 दापोली, मंडणगड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, गुहागर तालुक्यातील प्रत्येकी एका गटाची व दोन गणांची वाढ झाली आहे. गुहागर नगर पंचायतीमधून काही गावे वगळण्यात आल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या रचनेनुसार त्या तालुक्यातील एक गट आणि दोन गण वाढलेले होते. 2011 च्या लोकसंख्येचा आधार घेऊन प्रत्येक तालुक्यातील गटांची लोकसंख्या निश्चित केली गेली. त्यासाठी आयोगाकडून सुत्र निश्चित केलेले आहे. त्याप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद गटाची लोकसंख्या 21 हजार झाली आहे. नव्याने रचना केलेल्या गट, गणाचा प्रारुप आराखडा तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्याच्या आराखड्यांची तपासणी 14 फेब्रुवारीपर्यंत करावयाची आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून गुगल मॅपद्वारे नकाशे तयार करण्यात येतील. जुन्या निकषानुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे नाव गट, गणाला दिले जात होते. परंतु त्यामध्येही बदल करण्यात आला आहे. आता सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या महसूली गावाचे नाव गट, गणाला देण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गट, गणांची नावेही बदलली जाणार आहेत. राज्यातील सर्व जिल्हा परिषद गट व गणांचा प्रारुप आराखडा तयार झाल्यानंतर हरकती मागवल्या जाणार असून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

जिल्ह्यातील खेड व लांजा तालुक्यात मात्र जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणामध्ये कोणताही बदल होणार नसल्याने येथील इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरणार आहे. मात्र अन्य सात तालुक्यातील इच्छुकांची संख्या वाढली असून कोणता गट व गण नव्याने निर्माण होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.