जिल्ह्यात जलजीवन मिशनची ४३९ कामे पूर्ण

ठेकेदारांची ७० कोटींची बिले थकित; अखेरच्या टप्प्यातील कामे बंद

रत्नागिरी:- जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू करण्यात आली होती. जलजीवन मिशन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १ हजार ४३२ पाणीपुरवठा योजनांपैकी ४३९ कामे पूर्ण झाली आहेत. जलजीवन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची सुमारे ७० कोटी रुपयांची थकित असलेली कामांची बिले मिळावीत, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. यात जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कटाक्षाने लक्ष घालावे, अशी मागणी ठेकेदारवर्गातून केली जात आहे.

केंद्र सरकारच्या हर घर नल योजनेतून प्रत्येक घराला प्रतिमाणसी नळाद्वारे ५५ लिटर पाणी देण्यासाठी जलजीवन मोहिमेचे काम हाती घेण्यात आले. जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामे पूर्ण होवूनही शासनाकडून ठेकेदारांची टप्यात असलेली अनेक कामे ठेकेदारांनी बंद केली आहेत. जलजीवन मिशन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १ हजार ४३२ पाणीपुरवठा योजनांपैकी ४३९ कामे पूर्ण झाली आहेत. तर ३१९ योजना बिले थकित राहिली आहेत. तर शेवटच्या पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. कामे पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या कालावधीत कामे पूर्ण न झाल्याने या कामांना मुदत वाढवून देण्यात आली. जलजीवन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची सुमारे ७० कोटी रुपयांची बिले मिळावीत, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती. मात्र शासनाकडून निधी रखडल्याने कामे दिलेल्या मुदतीत कशी पूर्ण होणार? या विवंचनेत जि. प प्रशासनाला सामोरे जावे लागत आहे. राज्याला या योजनेतून ५०० कोटींचा निधी दिला जाणार आहे. पण या योजनेतून राज्यभरात झालेली कामे आणि मिळणार तुटपुंजा निधी पाहता त्याचा जिल्हयांमधील निधी वाटपावर परिणाम जाणवणार आहे.