जिल्ह्यात एसटीचे आठ आगार पुन्हा सुरु; रत्नागिरी आगार अजूनही पूर्ण बंद

रत्नागिरी:- जिल्ह्यात एसटी पुन्हा सुरळित सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कर्मचारी हजर होऊ लागले असून काल बुधवारी ५२६ कर्मचारी कामावर हजर होते. दररोज सोडण्यात येणाऱ्या फेऱ्या वाढत असून त्याचा उपयोग सामान्य प्रवाशांसह, विद्यार्थी, कामगारांना होत आहे. अजूनही ३७७९ कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी असून पगार झाल्यानंतर हे कर्मचारीसुद्धा हजर होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आगार वगळता अन्य सर्व आगारातील कर्मचारी हजर होऊ लागले असून तिथून वाहतूक सुरू झाली आहे. आतापर्यंत महामंडळाचे सुमारे पंधरा ते वीस कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मंगळवारी जिल्ह्यातील ४३ कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यातीलच आगारांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. काम बंद आंदोलन चिरडण्यासाठी महामंडळाने आता निलंबन, सेवासमाप्तीसह बदल्यांचे अस्त्र उगारले आहे. यामुळे चालक, वाहक हजर होतील, अशी चर्चा आहे. रत्नागिरी विभागातील सर्व आगारात चालक, वाहक थोड्या प्रमाणात हजर झाले आहेत. परंतु रत्नागिरी आगारातील शहर व ग्रामीण वाहतूक करणारे चालक, वाहक कामावर हजर झालेले नाहीत.

जिल्ह्यात मंगळवारी प्रशासकीय २७७, कार्यशाळा १६५, चालक ६०, वाहक ५६, चालक तथा वाहक २८ असे एकूण ५२६ कर्मचारी कामावर हजर होते. तसेच ५२ कर्मचारी अधिकृत रजेवर होते. त्यामुळे एकूण ५७८ कर्मचारी हजर होते. आता प्रतीक्षा चालक, वाहक, कारागीर कामावर हजर होण्याची आहे. हे कर्मचारी हजर झाल्याशिवाय वाहतूक सुरळित होणार नाही. सर्व बाजूंनी प्रशासनाने काम बंद आंदोलन मागे घेण्यासाठी ताकद लावली आहे. परंतु कर्मचारी अजून मागे हटत नाहीत.

जे कर्मचारी अद्याप कामावर हजर झालेले नाहीत त्यांचा पगार रोखण्यात आला आहे. जे कर्मचारी कामावर हजर झाले आहेत त्यांना नव्या वेतनश्रेणीनुसार पगारवाढ देण्यात आली आहे. सेवासमाप्त किंवा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे अशा कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहेत. आजपासून पगार जमा होण्यास सुरवात झाली असून तीन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांध्ये घालमेल सुरू झाली आहे. ज्येष्ठ कर्मचारी कामावर हजर होण्यास तयार आहेत. परंतु नवीन भरतीमधील कर्मचारी आंदोलनावर ठाम असून शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे या मागणीवर ठाम आहेत.