जिल्ह्यात उबाठा गटाला धक्का; संजय कदम शिंदे गटाच्या वाटेवर?

रत्नागिरी:- शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अनेक नेते पदाधिकारी पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अशातच आता रत्नागिरी जिल्ह्यात उबाठा गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार संजय कदम हे शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काही दिवसात हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. आता पुन्हा कोकणात ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे. दापोली विधानसभा मतदारसंघाचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे?. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि संजय कदम यांची मुंबईत बैठक झाली.? या बैठकीत संजय कदम यांची पक्षांतराची भूमिका ठरल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय कदम यांचा मुंबईत लवकरच पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. रामदास कदम यांच्या पालखी बंगल्यावर संजय कदम आणि रामदास कदम यांचे एकत्रित स्नेहभोजन झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. संजय कदम हे दापोली विधानसभा मतदार संघाचे उध्दव गटाचे पराभूत उमेदवार आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून योगेश कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यांनी अभूतपूर्व असा विजय मिळवला होता. तर शिवसेना ठाकरे गटाच्या संजय कदम यांचा पराभव झाला होता. दरम्यान, आता राजन साळवीनंतर आता संजय कदम हे उध्दव ठाकरेंची साथ सोडणार असल्यानं कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

कोकणात ठाकरेंकडे भास्कर जाधव सोडता आता कोणताही मोठा चेहरा राहिला नाही
उद्धव ठाकरेंचे एक एक शिलेदार त्यांना सोडून जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यात संजय कदम आणि रामदास कदम यांचे भांडण आहे. मात्र, आता ते देखील दोघे एकत्र येण्याची शक्यता आहे. संजय कदम यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशानं रामदास कदम आणि त्यांच्यातील वाद मिटण्याची शक्यता आहे. सध्या कोकणचा विचार करता ठाकरेंकडे भास्कर जाधव सोडता आता कोणताही मोठा चेहरा राहिला नाही. त्यामुळं कोकणात ठाकरेंची ताकद कमी होत असल्याचं बोललं जात आहे, तर दुपसरीकडे शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढत असल्याची चर्चा सुरु आहे.