रत्नागिरी:- शिवसेने झालेल्या सर्वात मोठ्या बंडानंतर झालेल्या 222 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने जिल्ह्यात असणारे वर्चस्व पुन्हा सिध्द करीत भगवा फडकवला. तब्बल 101 ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. खेड मतदार संघात योगेश कदम यांनी जोरदार मुसंडी मारली आहे तर रत्नागिरीतही पालकमंत्री सामंत यांनी ठाकरे गटाला जेरीस आणले. बाळासाहेबांच्या शिवसेनेने वरील दोन्ही मतदार संघात मोठी उडी घेतली आहे. गुहागर व राजापूरमध्ये आ. भास्कर जाधव व आ.राजन साळवी यांनी आपले वर्चस्व राखण्यात यश मिळवले आहे. चिपळूण मतदार संघातही ठाकरे गटाने राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला आहे. तर जिल्ह्यात भाजपाने 19 ग्रा.पं. ताब्यात घेत आपली घोडदौड सुरु केली आहे.

जिल्ह्यात झालेल्या 222 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. शिवसेना ठाकरे गटाने 101 ग्रामपंचायतीवर तर शिंदे गटाने 45 ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. भाजपाने 19 ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या असून, राष्ट्रवादीच्या खात्यात 8 तर काँग्रेसने 3 वर वर्चस्व मिळवले आहे. गावपॅनलने 45 ठिकाणी वर्चस्व राखले.
दापोली-खेड-मंडणगड मतदार संघामध्ये आमदार योगेश कदम यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला. परंतु ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. 30 ग्रामपंचायती बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे आल्याचे बोलले जात आहे. यामध्ये दापोलीत 22 ग्रामपंचायती, मंडणगडमध्ये सहा तर खेडमध्ये दोनवर योगेश कदम यांनी वर्चस्व राखले. महाविकास आघाडीला या ठिकाणी मोठा फटका बसला आहे.
गुहागर मतदार संघात भास्कर जाधव यांनी ठाकरे गटाचे वर्चस्व सिध्द केले. 14 पैकी 8 वर ठाकरे गटाने निर्विवाद विजय मिळवला. तर भाजपला दोन, गाव विकास पॅनलला 3 तर महाविकास आघाडीला 1 ग्रामपंचायत जिंकता आली. उर्वरीत सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

चिपळूणमध्ये 32 पैकी 12 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. 20 पैकी गाणे ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्याने याठिकाणी मतदान झाले नाही. उर्वरीत 19 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यात ठाकरे गटाने वर्चस्व राखले. याठिकाणी 8 ते 9 ठाकरे गटाला तर राष्ट्रवादीला 4 उर्वरीत गावविकास पॅनलने बाजी मारली.
रत्नागिरीमध्ये पालकमंत्री सामंत विरोधात ठाकरे गटात मोठी चुरस पहायला मिळाली. 29 पैकी 23 साठी सरपंच तर 25 ग्रा.पं÷.च्या सदस्यांसाठी निवडणूक झाली. सरपंचांपैकी 11 वर ठाकरे सेनेने दावा केला आहे तर 10 वर बाळासाहेबांच्या शिवसेनेने वर्चस्व सांगितले आहे. भाजपने 4 ग्रामपंचायती जिंकतानाच तब्बल 58 सदस्य निवडून आणल्याचे स्पष्ट केले. 6 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या.
संगमेश्वर तालुक्यातही ठाकरे सेनेने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले. याठिकाणी राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे. तर शिंदे गटाने संगमेश्वरात 2 ग्रामपंचायती घेत खाते खोलले. लांजा व राजापूरमध्ये आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाचे वर्चस्व राखण्यात यश मिळवले. राजापूरमध्ये ठाकरे गटाचे 17, भाजप 3, बाळासाहेबांची शिवसेना 2, चार गावपॅनल, एक राष्ट्रवादी तर एका ग्रामपंचायतीवर मनसेने दावा केला आहे. लांजामध्ये निवडणुक झालेल्या 19 पैकी 13 वर ठाकरे सेना, भाजप 2 तर गावविकास पॅनलने 4 ठिकाणी वर्चस्व मिळवले आहे..जिल्ह्यात प्रत्येक आमदाराने आपले वर्चस्व राखले असले तरी चिपळूण-संगमेश्वरमध्ये राष्ट्रवादीला ठाकरे गटाने शह दिल्याचे चित्र आहे.