जिल्ह्यात आतापर्यंत 107 पोलीस कोरोना बाधित 

रत्नागिरी:- कोरोनाच्या काळात महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 107 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये 7 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सर्वाधिक कर्मचारी रत्नागिरी तालुक्यातील आहेत. विशेष म्हणजे सर्वांची तब्येतीत चांगली सुधारणा होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी दिली.

कोरोनाच्या सुरुवातीच्या कालावधीत महाराष्टातील सर्वच पोलिसांना रस्त्यावर थांबून कोरोनापासून नागरिक लांब राहावे यासाठी 24 तास कार्यान्वित होते, यावेळी आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची पर्वा न करता पोलिसांनी आपली ड्युटी चोख बजावली, परिणामी लॉकडाऊन यशस्वीपणे झाला, मात्र आता जिल्हानतर्गत सेवा सुरू झाल्या आणि पोलिसांचे काम वाढले त्यामुळे महाराष्ट्रात सगळीकडे पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 100 कर्मचारी आणि 7 अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली आहे, मात्र यातील बहुतांश कर्मचारी यांनी कोरोनावर मात केली असून उर्वरित कर्मचारी, अधिकारी यांच्या तब्येतीत ही सुधारणा होत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मुंढे यांनी रत्नागिरी पोलीस मुख्यालय येथे पोलिसांसाठी कोरोना सेंटर सुरू केले आहे, परिणामी याचा चांगला फायदा पोलिसांना झाला. स्वतंत्र व्यवस्था असल्याने कर्मचारी बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. कोणत्याही कर्मचारी अथवा अधिकारी यांच्यात लक्षणे आढळल्यास त्वरित कोरवटाईन केले जाते, आणि वैद्यकीय नियंत्रणाखाली ठेवले जात आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात वेळेत बरे होण्याचे प्रमाण अधिक गतीने आहे.