वर्षभरात केवळ 21 रुग्ण ; एकही मृत्यू नाही
रत्नागिरी:- साथीच्या रोगामध्ये मोडणार्या डेंग्यूने गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यात थैमान घातले होते. मात्र यंदा ही साथ आटोक्यात असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी डेंग्यूचे 229 रुग्ण आढळले होते. मात्र चालू वर्षात डेंग्यूूचे केवळ 21 रुग्ण सापडले तर एकही रुग्ण दगावलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातून डेंग्यू हद्दपारीच्या वाटेवर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात तापसरी, डेंग्यू, मलेरिया या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यात जिल्हा अजूनही कोरोनातून भयमुक्त झालेला नाही. मात्र डेंग्यूच्या साथीची भीती कायम होती. ती आता काहीशी कमी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हिवताप विभागाकडून मोठ्या प्रमाणात डेंग्यूबाबत जनजागृती करण्यात आली. या मोहिमेच्या माध्यमातून डेंग्यूच्या निर्मूलनासाठी विविध कार्यक्रम राबविण्यात आले. माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती होताना दिसत आहे.
जिल्ह्यात 2019 मध्ये डेंग्यूचे 229 रुग्ण आढळले होते. मात्र आरोग्य विभागाकडून त्या रुग्णांवर वेळीच उपचार केल्याने एकही रुग्ण दगावला नव्हता. त्यानंतर जानेवारी 20पासून आतापर्यंत जिल्ह्यात 80 संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी 21 डेंग्यूचे रुग्ण मिळाले. त्यामध्ये स्थानिक 12 रुग्ण आणि स्थलांतरित 9 रुग्ण आहेत. डेंग्यू हा ‘एडीस् इजिटी’ या डासापासून होतो. डेंग्यू तापाकडे दुर्लक्ष झाल्यास तो जीवघेणा ठरु शकतो. यासाठी गप्पी माशांची पैदास केंद्र तयार करण्यात आली आहेत.