रत्नागिरी:- एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर आजही ठाम असून हा संप मागे घेण्यासाठी कर्मचाऱ्यांवर शासनाकडून दबावतंत्राचा वापर सुरू झालेला आहे. जिल्ह्यातील 143 कर्मचारी आतापर्यंत कामावर हजर झाले आहेत. तर या संपामध्ये सहभागी असलेल्या रत्नागिरी एसटी परिवहन विभागातील आतापर्यंत 86 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
शासनाकडून अजूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर तोडगा निघालेला नाही. गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या या संपातून हे कर्मचारी ठोस निर्णय झाल्याशिवाय मागे हटण्याची चिन्हे नाहीत. थ्यामुळे शासनाकडून या कर्मचाऱ्यांना संपातून माघार घेण्यासाठी काही तांसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. पण जोपर्यंत आपली रास्त मागणी शासनाकडून मार्गी लागत नाही, तोपर्यंत संपातून माघार नाही या भूमिकेवर एसटी कर्मचारी ठाम राहिलेले आहेत.
कर्मचाऱ्यांची या संपाबाबत असलेली ताठर भूमिका पाहता आता शासनाकडून संप मागे घेण्यासाठी पावले उचलण्यात आलेली आहेत. संपातील कर्मचाऱ्यांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी या संपात राहून पत्यक्षात एसटी बस सुरू करण्यात अडथळे आणले आहेत, त्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई एसटी परिवहन विभागाने केली आहे. रत्नागिरी विभागातील आतापर्यंत एकूण 86 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन केलेले आहे. त्यामध्ये पूर्वी 27 तर आता नव्याने 59 कर्मचाऱ्यांना समावेश असल्याचे एसटी विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. तर कामावर हजर होण्याच्या एसटी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरी विभागातील 143 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.